शेअर मार्केटमध्ये आकर्षक परताव्याचे आमिष; नाळे बंधूंविरुद्ध दोन गुन्हे दाखल
शेअर मार्केटमध्ये आकर्षक परताव्याचे आमिष; नाळे बंधूंविरुद्ध दोन गुन्हे दाखल
बारामती : शेअर मार्केट ट्रेडिंग व इन्व्हेस्टमेंटमध्ये गुंतवणूक केल्यास आकर्षक आणि निश्चित परतावा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम स्वीकारल्याच्या आरोपावरून कार्तिक अरविंद नाळे व गौरव अरविंद नाळे (रा. डोर्लेवाडी, ता. बारामती) यांच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही आरोपी सध्या फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
या प्रकरणात गु.र.नं. 249/2026 आणि गु.र.नं. 361/2026 असे दोन गुन्हे दाखल आहेत. पोलिसांकडून आरोपींनी गुंतवणूकदारांकडून स्वीकारलेली रक्कम प्रत्यक्ष शेअर मार्केटमध्ये गुंतवली होती की नाही, तसेच संबंधित बँक खाती, डीमॅट खाती, ट्रेडिंग अकाउंट, ब्रोकर व्यवहार आणि संपूर्ण मनी ट्रेलची तपासणी सुरू आहे.
22 लाखांच्या गुंतवणुकीचा आरोप
गु.र.नं. 361/2026 मध्ये फिर्यादी रणजित बाळासो शिंदे (रा. शिंदेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी आरोपींकडे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी एकूण 22 लाख रुपये दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. ही रक्कम बचत, कर्ज तसेच नातेवाईकांकडून घेतलेल्या पैशांतून दिल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे.
आरोपी कार्तिक नाळे यांच्या Axis Bank खात्यात तसेच गौरव नाळे यांच्या HDFC Bank खात्यात विविध व्यवहारांद्वारे रक्कम जमा केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच एका व्यवहारात रोख रक्कम दिल्याचा उल्लेख आहे. 1 सप्टेंबर 2022 रोजी 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीसंदर्भात नोटरीकृत करारनामा करण्यात आला होता. त्यामध्ये दरमहा 10 टक्के म्हणजे 50 हजार रुपये परतावा देण्याची अट असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.
सुरुवातीला काही रक्कम परतावा म्हणून मिळाल्याने आरोपींवरील विश्वास वाढला आणि त्यानंतर अधिक रक्कम गुंतविल्याचे फिर्यादीने नमूद केले. मात्र सप्टेंबर 2023 नंतर परतावा मिळणे बंद झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पहिल्या गुन्ह्यातही गुंतवणुकीचा आरोप
गु.र.नं. 249/2026 हा गुन्हा सोहेल कुतुबुद्दीन इनामदार यांच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम 316(2), 318, 340, 3(5) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमाच्या कलम 3 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
या गुन्ह्यात कार्तिक नाळे, गौरव नाळे तसेच BIG BULL INSTITUTE OF TRADING & FINANCE या नावाचा पोलीस अभिलेखात उल्लेख आहे. शेअर मार्केट ट्रेडिंग व गुंतवणुकीच्या माध्यमातून निश्चित परताव्याचे आश्वासन देऊन रक्कम स्वीकारल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.
बँक खाती आणि ट्रेडिंग व्यवहारांची तपासणी
पोलिसांकडून दोन्ही गुन्ह्यांचा आर्थिक अंगाने सखोल तपास केला जात आहे. आरोपींनी गुंतवणूकदारांकडून घेतलेली रक्कम कोणत्या खात्यांमध्ये जमा केली, पुढे ती कोणत्या खात्यांमध्ये वळविण्यात आली, आरोपींच्या नावावर किंवा संबंधित व्यक्तींच्या नावावर डीमॅट व ट्रेडिंग खाती आहेत का, प्रत्यक्ष शेअर मार्केटमध्ये व्यवहार झाले का, याची पडताळणी सुरू आहे.
याशिवाय बँक स्टेटमेंट, KYC कागदपत्रे, UPI, IMPS, NEFT, RTGS व्यवहार, डीमॅट होल्डिंग्ज, ट्रेडिंग लेजर, ब्रोकर स्टेटमेंट, लाभार्थी खाती आणि संबंधित मालमत्तांचीही माहिती तपासली जात आहे.
आरोपी फरार; शोधासाठी पथके कार्यरत
दोन्ही गुन्ह्यांतील कार्तिक अरविंद नाळे आणि गौरव अरविंद नाळे हे सध्या फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत असून तांत्रिक माहिती, मोबाईल लोकेशन आणि संपर्कातील व्यक्तींच्या आधारे आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
इतर गुंतवणूकदारांना पुढे येण्याचे आवाहन
कार्तिक नाळे, गौरव नाळे किंवा त्यांच्या संबंधित BIG BULL TRADING / BIG BULL INSTITUTE OF TRADING & FINANCE अथवा अन्य ट्रेडिंग-इन्व्हेस्टमेंट व्यवसायाच्या माध्यमातून निश्चित परतावा किंवा मासिक नफ्याचे आमिष दाखवून कोणाकडून रक्कम स्वीकारण्यात आली असेल आणि ती रक्कम अथवा परतावा अद्याप मिळाला नसेल, तर संबंधितांनी बारामती शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.
तक्रारदारांनी करारनामा, पावत्या, बँक स्टेटमेंट, चेक, UPI/NEFT/IMPS व्यवहार, WhatsApp संभाषण, ई-मेल, जाहिराती, ट्रेडिंग स्क्रीनशॉट अथवा डीमॅट स्टेटमेंट यांसारखे उपलब्ध पुरावे सोबत आणावेत, असेही पोलिसांनी सांगितले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असून गु.र.नं. 361/2026 चा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भंडारे करीत आहेत.
दरम्यान, नागरिकांनी अवास्तव किंवा हमखास परताव्याच्या आमिषाला बळी न पडता कोणतीही आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित व्यक्ती, संस्था आणि त्यांच्या नियामक नोंदणीची अधिकृत पातळीवर खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

