बारामतीत ५० फुटांवरील झाडावर अडकलेल्या दुर्मिळ शृंगी घुबडाची सुटका!
बारामतीत ५० फुटांवरील झाडावर अडकलेल्या दुर्मिळ शृंगी घुबडाची सुटका!
टीम रेस्क्यू बारामती आणि अग्निशामक दलाची तत्परता; जखमी घुबडाला उपचारासाठी पुण्याला हलवले
बारामती | प्रतिनिधी
बारामतीतील पाटस रोडवरील पांढरीच्या महादेव मंदिर परिसरात नायलॉन मांजामध्ये अडकलेल्या शृंगी घुबडाची टीम रेस्क्यू बारामती आणि बारामती अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेने सुटका केली. सुमारे ५० फुटांपेक्षा अधिक उंचीवरील झाडावर अडकलेल्या या घुबडाला तांत्रिक साधनांच्या मदतीने सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. या घटनेत घुबडाच्या पंखाला किरकोळ दुखापत झाल्याचे दिसून आल्याने त्याला पुढील उपचारांसाठी पुण्यातील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट येथे हलवण्यात आले.
पाटस रोडवरील पांढरीच्या महादेव मंदिर परिसरातून जात असताना आदित्य हिंगणे यांच्या निदर्शनास रस्त्यालगतच्या झाडावर एक मोठ्या आकाराचे घुबड नायलॉन मांजामध्ये अडकल्याचे आले. विशेष म्हणजे, घुबडाला कावळे आणि घारी मारत असल्याचेही त्यांच्या लक्षात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता वन्यजीव संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या टीम रेस्क्यू बारामती या संस्थेला माहिती दिली.
माहिती मिळताच अवघ्या १५ मिनिटांत टीम रेस्क्यू बारामतीचे सदस्य आणि बारामती अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तांत्रिक पोलच्या साहाय्याने उंच झाडावर अडकलेल्या घुबडाची मांजामधून सुटका करून त्याला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले.
घुबड बराच वेळ मांजामध्ये अडकून राहिल्याने त्याच्या पंखाला दुखापत झाल्याचे आढळले. याबाबत बारामतीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर घुबडाच्या वैद्यकीय उपचारांसाठी आणि पुढील काळजीसाठी त्याला पुण्यातील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट येथे हलवण्यात आले.
या बचावकार्यात टीम रेस्क्यू बारामतीचे श्रेयस कांबळे, अभिलाष बनसोडे, समर्थ कदम, ओंकार देवकाते तसेच बारामती अग्निशामक दलाचे निखिल काकडा, महेश सोनवणे आणि इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
शेतकऱ्याचा मित्र असलेल्या घुबडाचे संवर्धन गरजेचे
सुटका करण्यात आलेले घुबड हे शृंगी घुबड (Indian Eagle-Owl) असल्याची माहिती टीम रेस्क्यू बारामतीने दिली. घुबडांच्या विविध प्रजातींपैकी शृंगी घुबड आकाराने मोठे असून माळरान आणि डोंगराळ परिसरात प्रामुख्याने आढळते. हा पक्षी निशाचर असल्याने रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या शोधात बाहेर पडतो.
शेतातील उंदीर, बेडूक, छोटे कीटक आणि लहान सरपटणारे प्राणी हे घुबडाचे प्रमुख खाद्य आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान करणाऱ्या उंदरांवर नियंत्रण ठेवण्यात घुबडाची महत्त्वाची भूमिका असते. म्हणूनच घुबडाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते.
घुबडाबाबत समाजात अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमज प्रचलित आहेत. मात्र, अशा गैरसमजांना बळी न पडता वन्यजीवांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. कोणताही वन्य पक्षी किंवा प्राणी जखमी अवस्थेत आढळल्यास त्याला स्वतःहून इजा होईल अशा पद्धतीने हाताळण्याऐवजी स्थानिक वनविभागाशी संपर्क साधावा आणि बचावकार्यासाठी अधिकृत यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहन टीम रेस्क्यू बारामतीच्या वतीने करण्यात आले.
नायलॉन मांजामुळे पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे पक्ष्यांचे प्राण वाचवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर टाळणे आणि वन्यजीव संवर्धनासाठी जागरूक राहणे गरजेचे आहे.


