बारामती विधानसभा मतदार संघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध; मतदारांच्या संख्येत वाढ
बारामती: २०१ बारामती विधानसभा मतदार संघाच्या आगामी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. या कार्यक्रमानंतर आज, १० मार्च २०२६ रोजी बारामती मतदार संघाची अंतिम मतदार यादी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली असून, मतदारांच्या संख्येत लक्षणीय भर पडली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या ६ फेब्रुवारी २०२६ च्या आदेशानुसार हा पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करून नागरिकांकडून दावे व हरकती मागवण्यात आल्या होत्या. या प्रक्रियेनंतर आता अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे.
महिला आणि पुरुष मतदारांची आकडेवारी
अंतिम प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, बारामती विधानसभा मतदार संघात एकूण ३,८३,७६७ मतदार आहेत. ऑक्टोबर २०२४ मध्ये ही संख्या ३,८०,६०८ इतकी होती. नवीन यादीनुसार मतदार संघात १,९३,४१६ पुरुष मतदार, १,९०,३२७ महिला मतदार आणि २४ इतर मतदार नोंदवले गेले आहेत. पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान पुरुष आणि महिला दोन्ही गटांतील मतदारांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
१५ दिवसांत अपील करण्याची संधी
ही अंतिम मतदार यादी आजपासून सर्व नागरिक आणि राजकीय पक्षांच्या माहितीसाठी खुली करण्यात आली आहे. या यादीसंदर्भात कोणाला काही तक्रार किंवा आक्षेप असल्यास, लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५० मधील तरतुदीनुसार त्यांना पुढील १५ दिवसांच्या आत मा. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे अपील करता येणार आहे.
उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी (पुणे), मिनल कळसकर यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली असून, सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन केले आहे.


