गोवंशाच्या बेकायदेशीर वाहतुकीवर बारामती शहर पोलिसांची कारवाई; दोन गायींची सुटका


गोवंशाच्या बेकायदेशीर वाहतुकीवर बारामती शहर पोलिसांची कारवाई; दोन गायींची सुटका

बारामती : गोवंश जनावरांची बेकायदेशीर व नियमबाह्य वाहतूक रोखण्यासाठी बारामती शहर पोलिसांनी कारवाई करत दोन जर्सी गायींची सुरक्षित सुटका केली. या कारवाईत पिकअप वाहनासह एकूण २ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. ३ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास बारामती शहर हद्दीतील मॅकडॉल कंपनीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर एका पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा पिकअपमधून दोन गायींची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गोवंश बचाव कार्य करणाऱ्या टीममधील वैभव थोरात यांनी ही माहिती पोलिसांना दिली.

माहिती मिळताच पोलिसांनी MH-13-CU-2064 क्रमांकाचे पिकअप वाहन थांबवून तपासणी केली. वाहनामध्ये एक काळसर रंगाची जर्सी गाय आणि एक काळ्या-पांढऱ्या रंगाची जर्सी गाय आढळून आली.

वाहन चालक शब्बीर इमाम शेख (रा. आसू, ता. फलटण, जि. सातारा) याच्याकडे जनावरांच्या मालकी, खरेदी-विक्री, वाहतुकीचा उद्देश, अंतिम गंतव्य तसेच आवश्यक पशुवैद्यकीय प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांबाबत चौकशी करण्यात आली. मात्र प्राथमिक तपासात समाधानकारक माहिती व आवश्यक कागदपत्रे सादर झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

तसेच जनावरांच्या वाहतुकीदरम्यान आवश्यक पाणी, चारा, प्रथमोपचार आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन झाले नसल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी वाहन व दोन्ही गायी ताब्यात घेतल्या.

Advertisemen

याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३६२/२०२६ अन्वये प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक अधिनियम, १९६० मधील कलम ११(१)(d) तसेच Transport of Animals Rules, 1978 मधील संबंधित नियमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईमध्ये पिकअप वाहनाची किंमत २ लाख रुपये, काळसर जर्सी गाय ३० हजार रुपये आणि काळ्या-पांढऱ्या जर्सी गाय २० हजार रुपये, असा एकूण २ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही गायींची पशुवैद्यकीय तपासणी करून त्यांच्या सुरक्षित देखभालीसाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे, पोलीस शिपाई विशाल चौधर आणि लतिफ इनामदार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

संशयास्पद जनावरांची वाहतूक आढळल्यास नागरिकांनी स्वतः कायदा हातात न घेता पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन बारामती शहर पोलिसांनी केले आहे. नागरिकांनी बारामती शहर पोलीस ठाणे किंवा डायल ११२ वर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख आवश्यकतेनुसार गोपनीय ठेवण्यात येईल.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »