बारामती: बेकायदेशीर गौण खनिज वाहतूक करणारा डंपर तहसीलदार पथकाच्या ताब्यातून पळवला; तिघांवर गुन्हा दाखल
बारामती: बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर मुरूम उत्खनन आणि वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकाला गुंगारा देऊन, ताब्यात घेतलेला डंपर पळवून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी मंडल अधिकारी चेतन रामदास पोळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून बारामती तालुका पोलिसांनी डंपर चालक, मालक आणि एका अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीचे तहसीलदार यांच्या आदेशान्वये अवैध उत्खनन रोखण्यासाठी मंडल अधिकारी चेतन पोळ आणि त्यांच्या पथकाने १० मार्च २०२६ रोजी रात्री गोजुबावी परिसरात गस्त घातली होती. रात्री १०:३० च्या सुमारास गोजुबावी ते उंडवडी क.प. कडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर त्यांना मुरूम भरलेला एक सहा टायर डंपर (रजि. नं. एम.एच. ४२. टी. ०९२०) संशयास्पदरीत्या येताना दिसला. पथकाने डंपर थांबवून चालक तांदळे (रा. पिंपळी) याच्याकडे चौकशी केली असता, त्याच्याकडे मुरूम वाहतुकीचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे समोर आले. यावेळी डंपर मालक भैया निकम (रा. झारगडवाडी) हा देखील घटनास्थळी हजर झाला, मात्र त्यानेही परवाना नसल्याचे सांगितले.
महसूल विभागाने सुमारे ४ ब्रास मुरुमासह १२ लाख रुपये किमतीचा हा डंपर जप्त करून पुढील कारवाईसाठी बारामती तालुका पोलीस ठाण्याकडे नेण्यास सुरुवात केली. एम.आय.डी.सी. रोडवरील पियाजो कंपनीजवळ डंपर आला असता, अचानक एका अज्ञात इसमाने गाडीसमोर येऊन डंपर थांबवला. यावेळी चालक तांदळे खाली उतरला आणि त्या अज्ञात व्यक्तीने डंपरचा ताबा घेऊन तो भरधाव वेगाने पळवून नेला.
सरकारी कामात अडथळा निर्माण करून आणि महसूल बुडवून पसार झालेल्या या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), १३२ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि खाण व खनिज अधिनियमनांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल राजश्री बापूराव आटोळे या करीत आहेत.


