पथविक्रेता की अतिक्रमण बा.न.प ने आपली भूमिका स्पष्ट करावी
बारामती – बारामती मध्ये पथविक्रेत्यांचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. भाडं खाणाऱ्या ठराविक लोकांचा हा पोटाचा प्रश्न नाहीये पण बहुसंख्य पथविक्रेतांना जीवन मरणाचा प्रश्न असल्याची तीव्र जाणीव आहे. भंगरातून आणलेले हातगाडे त्यांना कसं बसं दुरुस्त करून घरातील किडूक मिडूक विकून तरकारी फळांचा व्यवसाय करणारे हे कष्टकरी बारामती नगर परिषदेच्या धोरणाला विरोध करण्यासाठी आज रस्त्यावर उतरलेले आहे. जे चार लोकं मोक्याचा जागा धरून त्यांच्यावर गाडेरूपी अतिक्रमण करून अशा जागा सर्वसामान्य कष्टकऱ्यांना भाड्याने देतात व भाड्याची भाड खातात अशा चार चौघांना पोटाची खळगी कशी भरायची याची भ्रांत नाही. पण ज्या लोकांना रोजच पहाटे पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत रक्त जाळून कच्च्या-बच्च्यांना दोन वेळचं अन्न देण्याची काळजी पडली आहे अशा सर्वसामान्य कष्टकऱ्यांचं काय?
पथविक्रेता आणि अतिक्रमण निर्मूलन याविषयी हॉकर्स सभासदांना व त्यांच्या प्रतिनिधींना 2 तारखेला 4 वाजता विचार विनिमयाला बारामती नगर परिषदेने बोलवले आहे. आदर्श विकसित बारामती मध्ये हॉकर्स झोन नावाची कुठलीही योजना कार्यरत नाही ती करण्याची गरज नाही इथल्या शासनकर्त्यांना आणि प्रशासकाला याची निगड पडली नाही. मतदार हे मालक नसतात निवडणूक पुरती ते मायबाप असतात याची संपूर्ण जाणीव इथल्या शासकाला आहे. तर इथला प्रशासक हा चावी बसलेला खेळणं आहे त्यामुळे चावी आहे तोपर्यंत तो काम करणार चावी संपल्यानंतर तो इथंलं काम सोडून निघून जाणार मायबापाच्या आशीर्वादाने कमवायची जागा मिळाल्यामुळे मायबापाच्या स्वाधीन आधीन राहणाऱ्या हे प्रशासक इथल्या स्थानिक पिढ्यांना पिढ्या वास्तव्य करणाऱ्या व पुढच्या दहा पिढ्या दिल्यास मसणात जाळणाऱ्या किंवा पुरणाऱ्या लोकांच्या गरजा बद्दल या प्रशासका ला काही घेणं देणं नाही.
अतिक्रमण हे स्थायी व अस्थायी असतं अस्थायी अतिक्रमण काढण्यासाठी इथल्या नेत्याने व प्रशासनाने कंबर कसली आहे. पण इथे काबाड कष्ट करून पोटं भरणाऱ्या लोकांच्या उपजीविकेबद्दल उपजीविकेच्या साधनसामग्री बद्दल इथले नेते व प्रशासक बोलायला तयार नाहीत. त्यांच्या उपजीविकेसाठी विधी उपविधी कायद्याप्रमाणे त्यांना व्यवस्थित जागा देऊन त्यांना उपजीविकेचे साधन निर्माण करून देण्याची जबाबदारी ही इथल्या नेते पुढारी व कायद्याने प्रशासकाची आहे. बारामती नगरपरिषदेच्या मालकीच्या कित्येक व्यापार संकुलन गाळ्यांमध्ये बेकायदेशीर धंदे चालू आहेत नियमबाह्य घटना घडत आहेत. असे असताना प्रशासक फक्त आणि फक्त पथविक्रेते यांच्या अतिक्रमणावर हातोडा, बुलडोझर, जेसीबी फिरवायला तयार आहेत. ज्या रस्त्यावर पथ विक्रीते अस्थायी अतिक्रमण करून आपली उपजीविका उदरनिर्वाह चालवत आहेत. अशा टिचभर कमाईच्या कष्टकऱ्यांवर बुलडोझर चालवण्यास कुठली कायद्याची अंमलबजावणी केली जात आहे.
बारामती नगरपरिषद अतिक्रमण विभाग मुख्याधिकारी व बारामती शहरातील वाहतूक नियंत्रण शाखा आणि पोलीस निरीक्षक बारामती यांची संयुक्त बैठक होऊन बारामतीतील अस्थायी अतिक्रमानाबद्दल चर्चा झाली आहे व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एखादं प्रसिद्ध पत्रक काढलेले आहे किंवा संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जनसामान्यांना या उपायोजनाबद्दल अंमलबजावणी करण्याची सूचना विनंती केली आहे का? असे केल्याने दाट लोक वस्तीत व्यापार पेठेत किंवा इतर उद्योगधंद्यांच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होणार नाही पदचार्यांना त्याचा त्रास होणार नाही व्यापाऱ्यांना त्याचा व्यापार करण्यास अडचण येणार नाही असे संयुक्तिक धोरण आखण्यास विकसित बारामतीचे राजकीय प्रशासकीय सल्लागार पदाधिकारी यांनी प्रयत्न केल्याचे आढळून आले नाही.
साप सोडून भोईला धोपाट्या घालणारी ही प्रवृत्ती बदलणार आहे की नाही. अस्थायी अतिक्रमणाबद्दल फेरेवाल्यांच्या पथविक्रेत्यांच्या उपजीविका व साधनसामग्री बद्दल मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाने अनेक मार्गदर्शक सूचना आणि आदेश दिले आहे. त्याची पायमल्ली बारामती नगरपरिषद सातत्याने करीत आहे बेकायदेशीर बांधकाम पथदिव्यांवरचे वायरचे अतिक्रमण बारामतीतील खेळाच्या जागा वृक्षतोड याबद्दल हायकोर्टाने अनेक बारामती नगरपरिषद विरुद्ध निर्णय दिले असतानाही असे आदेश कचऱ्याच्या टोपलीत टाकणारी बारामती नगरपरिषद बारामतीतील पथविक्रेत्यांबद्दल एवढी आकसाने का वागत आहे?
बारामतीच्या सुशोभीकरणांमध्ये हा काळा डाग आहे. त्यामुळे बारामतीचे सौंदर्य लोप पावल ती क्रुप अस्तव्यस्त दिसते असे जर तुम्हाला वाटत असेल तर बारामतीतील या छोट्या मोठ्या व्यवसायिकांनी कोरोना काळात या बारामतीकरांना अन्नधान्य भाजीपाला फळे पुरवला इथल्या कृत्रिम सुशोभीकरणापेक्षा इथला माणूस कष्टाने जगला पाहिजे मेहनतीने उभा राहिला पाहिजे तो सुरक्षित आणि स्वातंत्र जगला पाहिजे त्याला मूलभूत सुख सोयी निर्माण करून दिल्या पाहिजेत ही भावना नेत्याला आणि प्रशासकाला का निर्माण होत नाही. चार दिवसाच्या पावसाने बारामतीचे विकास मॉडेल देशोधडीला लागले तेव्हा आत्मचिंतन करून यामध्ये दोषी असणाऱ्या ठेकेदारांना अभियंतांना (इंजिनियर) आणि अशी निरोपयोगी कामे करण्यास लावणाऱ्यां सर्वांना दोषी धरले पाहिजे. तीन बाय तीन च्या हातगाड्यावर आपले कुटुंबाचे उदरनिर्वाह करणारा कष्टकरी उध्वस्त करून कोट्यावधी रुपये कमावणारा बेकायदेशीर बांधकाम करणारा वाहन तळे विकणारा अब्जाधीश इथे वाहतूक कोंडी करत आहे. त्याच्याबद्दल बारामती नगरपरिषदने आपले धोरण स्पष्ट करावे. ज्या ज्या इमारतीचे पार्किंग संपुष्टात आले आहे अशा बेकायदेशीर अतिक्रमणाबद्दल बारामती नगरपरिषदने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. तसेच बारामती नगर परिषद ने पथविक्रेता व उपजीविका धोरण जाहीर करावे. वाहन तळे वाहन व्यवस्था हॉकर्स झोन यांच्या बद्दलचे कायदेशीर धोरण जाहीर करून त्याची अंमलबजावणी करण्यासंबंधी आग्रह धरावा अन्यथा असे आंदोलन करून नेत्यांना प्रशासनाला बदनाम करून विकसित बारामतीचे अब्रूची लक्तरे मुंबईच्या गेट ऑफ इंडिया वर टाकली जातील.


