बारामती वकील संघ निवडणूक : अध्यक्षपदी ॲड. सचिन सुधाकर वाघ बिनविरोध; उर्वरित पदांसाठी चुरशीची लढत


बारामती, दि. : बारामती वकील संघाच्या सन २०२६–२०२७ या वर्षासाठी होणाऱ्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ॲड. सचिन सुधाकर वाघ यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. उमेदवारी अर्जांची छाननी व माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अध्यक्षपदाच्या शर्यतीतील ॲड. सुप्रिया ज्ञानदेव काकडे, ॲड. अविनाश वामनराव गायकवाड आणि ॲड. अभिजीत संभाजीराव जगताप यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ॲड. वाघ यांची बिनविरोध निवड झाली.

मात्र, संघाच्या इतर पदांसाठी निवडणूक रंगतदार होणार असून विविध पदांसाठी अनेक उमेदवार रिंगणात कायम आहेत.

उपाध्यक्ष पदासाठी ॲड. माधुरी अतुल नेवसे, ॲड. चित्रा दत्तात्रय वाघमोडे, ॲड. अक्षय आनंद गायकवाड, ॲड. राजेंद्र आबासो मासाळ, ॲड. महेश प्रल्हाद आटोळे आणि ॲड. शकीला महामूद आत्तार यांच्यात लढत होणार आहे. या पदासाठी ॲड. सचिन शहाजी दळवी यांनी उमेदवारी मागे घेतली.

सचिव पदासाठी ॲड. विक्रांत बळवंत कोकरे आणि ॲड. स्नेहा माणिक मखरे यांच्यात थेट सामना होणार असून ॲड. हर्षद लालासो जगदाळे यांनी माघार घेतली आहे.

सहसचिव पदासाठी ॲड. आकाश प्रभाकर घारे आणि ॲड. विशाल सुदर्शन होळकर हे उमेदवार रिंगणात आहेत. ॲड. भूषण आनंदा जगताप यांनी उमेदवारी मागे घेतली.

Advertisemen

ग्रंथपाल पदासाठी ॲड. अक्षय आनंद गायकवाड आणि ॲड. कल्याण पोपट राजगुरू यांच्यात लढत होणार असून ॲड. राहुल पोपट बंडगर यांनी उमेदवारी मागे घेतली.

खजिनदार पदासाठी ॲड. हर्षद अशोक तिकोटे आणि ॲड. भूषण आनंदा जगताप यांच्यात निवडणूक होणार असून या पदासाठीही ॲड. राहुल पोपट बंडगर यांनी माघार घेतली आहे.

महिला प्रतिनिधी पदासाठी ॲड. नुजहत इरफान शिकीलकर आणि ॲड. भाग्यश्री शंकर जगधने यांच्यात थेट लढत होणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दि. ४ जुलै २०२६ रोजी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली असून, उर्वरित सर्व पदांसाठी चुरशीची निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, निवडणूक प्रक्रियेदरम्यान काही उमेदवारांवर माघारीनंतरही पाठिंबा देण्यासाठी भावनिक व इतर प्रकारचा दबाव टाकला जात असल्याच्या चर्चा वकील वर्तुळात सुरू आहेत. नियमबाह्य तडजोडी, तसेच ‘साम, दाम, दंड, भेद’ यांसारख्या राजकीय डावपेचांचा वापर होत असल्याचे आरोप काही स्तरांतून केले जात आहेत. मात्र, या आरोपांबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नसून संबंधितांकडून यावर अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »