बारामती शहर पोलिसांची धडक कारवाई; खुनाच्या प्रयत्नातील चार महिन्यांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद
बारामती शहर पोलिसांची धडक कारवाई; खुनाच्या प्रयत्नातील चार महिन्यांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद
बारामती, दि. ११ जुलै : खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यात तब्बल चार महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला बारामती शहर पोलिसांनी विशेष कोंबिंग ऑपरेशन राबवून अटक केली आहे. श्याम विलास सकट असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८५/२०२६ अन्वये आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल आहे. हा प्रकार ५ मार्च २०२६ रोजी इंदापूर चौक परिसरातील हॉटेल गोकुळ येथे घडला होता. फिर्यादी आशिष प्रदीप केकाण यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून गंभीर दुखापत करण्यात आल्याचा आरोप आहे.
तपासादरम्यान जखमीवर भाग्यजय हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. वैद्यकीय अहवालात डोक्यासह शरीरावर गंभीर जखमा झाल्याचे स्पष्ट झाले. या गुन्ह्यातील एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला यापूर्वी ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित बालकाला निरीक्षणगृहात पाठविण्यात आले.
दरम्यान, मुख्य आरोपी श्याम सकट हा गुन्हा दाखल झाल्यापासून सतत फरार होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी शोधमोहीम, नातेवाईकांकडे चौकशी तसेच न्यायालयामार्फत जाहीरनाम्याची प्रक्रिया राबविली होती. मात्र आरोपी पोलिसांना चकवा देत होता.
१० जुलै रोजी आमराई परिसरात राबविण्यात आलेल्या विशेष कोंबिंग ऑपरेशनदरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी एका घरात लपून बसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून त्याला ताब्यात घेत अटक केली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे, पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे, यशवंत पवार तसेच पोलीस शिपाई संतोष जगताप, कविटके, दत्ता मदने, अक्षय सिताफ आणि अमोल देवकाते यांनी सहभाग घेतला.
अटक आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार आरोपी गावठी हातभट्टी दारू विक्रीसारख्या बेकायदेशीर कृत्यांमध्येही सहभागी असल्याची माहिती समोर आली असून त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे करीत आहेत.


