सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तब्बल ₹३.७३ कोटींची फसवणूक; बारामतीत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तब्बल ₹३.७३ कोटींची फसवणूक; बारामतीत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
बारामती, दि. १ ऑगस्ट : सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तब्बल ११७ उमेदवारांची आणि एका लेबर कॉन्ट्रॅक्टरची मिळून ₹३ कोटी ७३ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा क्र. ३५५/२०२६ म्हणून नोंदविण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रणजित हरिभाऊ मोरे (रा. बारामती) यांनी दिलेल्या तक्रारीत आरोपी सुभायू सरकार उर्फ राणा आणि प्रमोद भगवान गुरव यांनी आरोग्य विभाग, वन विभाग, जलसंपदा विभाग, समाजकल्याण विभाग तसेच रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप केला आहे. त्यासाठी संबंधित विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यात आला.
तक्रारीनुसार, सन २०२३-२४ मधील विविध भरती प्रक्रियेसाठी एकूण ११७ उमेदवारांकडून अर्ज भरून घेण्यात आले. त्यानंतर उमेदवारांकडून टप्प्याटप्प्याने कोट्यवधी रुपयांची रक्कम ऑनलाइन व रोख स्वरूपात स्वीकारण्यात आली. आरोपींनी एकूण ₹३ कोटी ७३ लाख स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी उमेदवारांना बनावट निवड यादी, बनावट शासकीय शिक्के आणि बनावट नियुक्तीपत्रे देऊन सरकारी नोकरी लागल्याचा भास निर्माण केला. काहींना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आल्याचेही सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात कोणालाही सरकारी नोकरी मिळाली नसल्याने फसवणूक झाल्याचे उघड झाले.
या प्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक नारायण विनायकराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.


