इंदापूरमध्ये ३२०० किलो प्रतिबंधित मांगूर मासे नष्ट; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
इंदापूरमध्ये ३२०० किलो प्रतिबंधित मांगूर मासे नष्ट; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
इंदापूर : कांदलगाव परिसरात प्रतिबंधित मांगूर माशांचे बेकायदेशीर संवर्धन करून त्यांची विक्री केल्याच्या तक्रारीवरून इंदापूर पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कारवाईदरम्यान शेततळ्यातील अंदाजे ३२०० किलो प्रतिबंधित मांगूर मासे जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदून जागेवरच नष्ट करण्यात आले.
राजेंद्र रूपचंद राठोड, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, यांनी याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, कांदलगाव येथील बले व्यंकटराज किन्ना हा प्रतिबंधित मांगूर जातीच्या माशांचे संवर्धन करत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार २१ ऑगस्ट रोजी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली.
यापूर्वी संबंधित व्यक्तीला प्रतिबंधित मांगूर मासे नष्ट करण्याबाबत सूचना देण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. मात्र, शेततळ्यातील मासे नष्ट केलेले नसल्याचे आढळून आल्यानंतर मत्स्यव्यवसाय, पाटबंधारे व महसूल विभागातील अधिकारी तसेच पोलिसांच्या उपस्थितीत माशांची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान शेततळ्यातील मासे हे प्रतिबंधित मांगूर (Clarias gariepinus) जातीचे असल्याचे प्रथमदर्शनी आढळले. त्यानंतर पंचनामा करून अंदाजे ३२०० किलो मासे जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदून तांत्रिक पद्धतीने जागेवरच नष्ट करण्यात आले.
या प्रकरणी पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ मधील कलम ३, ५ व १५, अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील कलम ५९ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार दिपाली भास्कर दुर्गुडे करीत आहेत.


