इंदापूरचा सुपुत्र हरीश डोंबाळे सायकलिंगमध्ये देशात अव्वल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते गौरव
इंदापूर: जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर इंदापूर तालुक्यातील न्हावी येथील हरीश दीपक डोंबाळे याने सायकलिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर देदीप्यमान यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते भरणेवाडी येथे हरीशचा विशेष सन्मान करण्यात आला. “हरीशने महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले असून तो इंदापूर तालुक्याचा अभिमान आहे,” अशा शब्दांत भरणे यांनी त्याचे कौतुक केले.
दोन सुवर्ण पदकांची कमाई
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात कला शाखेत (प्रथम वर्ष) शिकणाऱ्या हरीशने दोन वेगवेगळ्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे:
* ओडिसा (संबलपूर): ३० व्या राष्ट्रीय रोड रेस स्पर्धेत १०० किमी सायकलिंगमध्ये ज्युनिअर वयोगटातून देशात प्रथम क्रमांक.
* उत्तराखंड (रुद्रपूर): ट्रॅक स्पर्धेत ‘टीम स्प्रिंट’मध्ये प्रथम क्रमांक.
जिद्दीने मिळवले यश
या सन्मान सोहळ्याप्रसंगी इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव विरसिंह रणसिंग, हरीशचे वडील दीपक डोंबाळे, आई आशा डोंबाळे, त्याचे आजोबा आणि न्हावी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे सचिव विरसिंह रणसिंग यांनी बोलताना सांगितले की, “हरीशने अत्यंत जिद्दीने १०० किलोमीटर मास्टर्स सायकलिंग स्पर्धेत भारतात सुवर्णपदक मिळवून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे.” या यशाबद्दल मंत्र्यांनी हरीशच्या पालकांचे आणि संस्थेचेही अभिनंदन केले.

