असुरक्षित पोलीस एक वेगळा दृष्टिकोन; कुंपणच शेत खातंय का?
इंदापूर विष्णू सुभाष केमदारने पोलीस हवालदार इंदापूर पोलीस स्टेशन यांच्या अचानक बेपत्ता झाल्याची बातमी व त्यांच्या पत्नीने दिलेली फिर्याद व त्यानंतर माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या मुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलिन झाली की काय? याबद्दल अनेक आख्यायिका, कथा, अफवा पसरवू लागल्या आणि एक नागडं सत्य बाहेर पडलं या फिर्यादीवर चौकशी अधिकारी चौकशी करेलच, फौजदारी संहितेप्रमाणे कारवाई होईलच, उच्च खात्याअंतर्गत उच्चस्तरीय चौकशी आपले निकष नक्कीच काढेल, गृह खात्याला वरिष्ठांना अहवाल सादरही केला जाईल, शेरे उपशेरे फेर चौकश्या जाब जबाब साक्षी पुरावे घेतले जातील, कागदं रंगवली जातील पण यातून नेमके निष्पन्न काय होणार आहे हे निश्चित सांगता येणार नाही.
आज पोलीस खात्यामध्ये नेमकं चाललंय काय? याबद्दल जनसामान्यांमध्ये अनेक गंभीर प्रश्नांची मालिका सुरू आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अलिखित नियमावलीवर व स्वनिर्मित कायद्यांवर कामकाज चालतंय हे निश्चित झालं आहे. साहेबांचा अडली, साहेबांचा कलेक्टर, ड्युटी लावणारा कर्मचारी, काम वाटप नोंदवही विरुद्ध 2 नंबरचे व्यवसाय करणाऱ्या लोकांशी प्रत्यक्ष संबंध ठेवणारा कर्मचारी उदाहरणार्थ मटक्याचा व्यवसाय करणारा व्यावसायिक, जुगारीचा अड्डा चालवणारा, हातभट्टीची दारू काढणारा, रासायनिक दारू विकणारा, गांजा व्यवसाय करणारा, आधुनिक टर्मिनचा व्यवसाय करणारा, बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणारा, गुटखा विक्री करणारा, वाळू व मुरूम वाहतूक करणारा असे भिन्न 2 नंबरचे धंदे करणाऱ्या लोकांवर प्रत्येक विभागासाठी एक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. पोलीस ठाण्यामध्ये येणाऱ्या 161 ची प्रकरण हाताळणारे कर्मचारी वेगळेच नियुक्त केले जातात व त्याचे हिशोब ठेवणारे वेगळेच असतात.
या सगळ्या अलिखित स्वनिर्मित कायद्याच्या अंमलबजावणीतून होते. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सातत्याने या नियमबाह्य नियुक्त्यावरून चढावढ रस्सीखेच व वादावाद चालू असते. हिस्या वाटण्यावरून नित्याचे वादही पारंपारिक गोष्ट आहे.
इंदापूरचे प्रकरण हे असेच तर नाही ना? ज्यामुळे एका पोलीस अधिकाऱ्याला एका हाताखाली काम करणाऱ्या पोलीस हवालदारचा इतका मानसिक छळ करावा लागतो की तो कामधंदा घरदार सोडून परागंदा होईल. पोलीस हवालदार विष्णू सुभाष केमदारने यांना जीवाच्या भीतीने नोकरीच्या भीतीने घर सोडून पळून जावे लागले. ही गंभीर बाब वरिष्ठांच्या संवेदनशील मनाला लागणार आहे की नाही असे अनेक कर्मचारी आहेत जे कर्तव्यदक्ष निष्कलंक समाज सेवा देणारे आहेत. परंतु त्यांच्या नियुक्त्या योग्य ठिकाणी योग्य वेळी होत नाहीत. त्यामुळे पूर्ण कार्यक्षमतेने कर्मचाऱ्यांचा वापर पोलीस खात्यामध्ये होत नाही. असे असल्यामुळे कामाच्या ताणाने कौटुंबिक विसंवादामुळे व कार्यालयीन एकोपा नसल्यामुळे अनेक सोपे गुन्हे अवघड केले जातात. परस्पर विरोधी फिर्यादी देण्यास भाग पाडले जाते व नाहक जनतेला वेटीस धरून कोर्ट कचेऱ्या आर्थिक मानसिक त्रास दिला जातो. या त्रासाचा परिणाम अनेक प्रकरणात वाढीव काम कर्मचाऱ्यांच्या पदरी पडते. ज्या कामात वेळ देण्याची गरज नाही अशा कामांना नाहक वेळ देऊन कर्मचाऱ्यांची वरिष्ठांकडून पिळवणूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे कर्तव्य बजावताना खात्याअंतर्गत होणारा त्रास बेकायदा जबाबदाऱ्या कौटुंबिक ताण तणाव यामुळे इंदापूर सारखे असंख्य प्रकरण पोलीस खात्यामध्ये आहेत. पोलिसांमध्ये वैफल्यग्रस्तता मानसिक ताण मधुमेह रक्तदाब यासारखे गंभीर आजारांचे प्रमाण वाढले आहे. आज इंदापूर मधल्या प्रकरणावरती वरिष्ठांनी एक पत्रकार परिषद घेऊन हे प्रकरण का कसे व कोणामुळे घडले दोशींवर काय कारवाई केली किंवा करणार आहात याबद्दल खुलासा करणे गरजेचे आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या व जनसामान्यांच्यात निर्माण झालेले प्रश्न निकाली निघतील. ज्या पोलीस प्रशासनामुळे इथला समाज स्वस्त निद्रा घेतो सुरक्षित राहतो स्वातंत्र्य उपभोगतो त्याच पोलीस प्रशासनामध्ये एका कर्मचाऱ्यांची पत्नी, तो कर्मचारी व त्याचे कुटुंबीय असुरक्षित व भीतीदायक वातावरणात जगत असेल तर सर्वसामान्यांची काय अवस्था आहे हे विचार न केल्यास बरे!