उपमुख्यमंत्री अजितदादांच्या निधनाने मेडदवर शोककळा; शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाला ‘स्व. अजितदादा पवार’ यांचे नाव देण्याची सरपंच गणेश काशीद व ग्रामस्थांची मागणी


बारामती (प्रतिनिधी): राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे भाग्यविधाते अजितदादा पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यासह बारामती तालुका पोरका झाला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मेडद (ता. बारामती) गावावर शोककळा पसरली असून, आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गावात भव्य शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेडदचे सरपंच गणेश काशीद आणि समस्त ग्रामस्थांनी एकमुखी मागणी करत, येथील नूतन शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाला ‘स्व. अजितदादा पवार’ यांचे नाव देण्याची आग्रही विनंती सरकारकडे केली आहे.
शोकसभेच्या सुरुवातीला अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. मेडद गावाशी दादांचे जिव्हाळ्याचे नाते होते. गावातील विकासकामांपासून ते सामान्य कार्यकर्त्याच्या सुख-दुःखापर्यंत दादा नेहमीच धावून येत असत, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. दादांच्या शिस्तीमुळे आणि विकासकामांच्या धडाक्यामुळेच बारामतीचा कायापालट झाला असून, त्यात मेडद गावाचाही मोठा वाटा असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले.
याप्रसंगी बोलताना मेडदचे सरपंच गणेश काशीद म्हणाले की, “अजितदादांनी राज्याच्या राजकारणात आपले अढळ स्थान निर्माण केले होते. मेडदमध्ये शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व्हावे, हे त्यांचे स्वप्न होते आणि त्यांनी ते पूर्णत्वास नेले. ज्या नेत्याने या मातीसाठी आणि इथल्या शैक्षणिक, वैद्यकीय प्रगतीसाठी आपले आयुष्य वेचले, त्यांचे नाव या वास्तूला असणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणूनच, मेडद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे नामकरण ‘स्व. अजितदादा पवार शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय’ असे करण्यात यावे, अशी मागणी आम्ही ग्रामस्थांच्या वतीने राज्य सरकारकडे करत आहोत.”
या शोकसभेला गावातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, विविध संस्थांचे अध्यक्ष, युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून आपल्या लाडक्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. दादांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे, अशा शब्दांत उपस्थितांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »