निलेशभई कोठारी यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड; कबीर तांबोळी कार्यकारिणी सदस्य


निलेशभई कोठारी यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड; कबीर तांबोळी कार्यकारिणी सदस्य

नवी दिल्लीतील राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवारांच्या हक्कांसाठी देशव्यापी संघटन विस्ताराचा निर्धार

नवी दिल्ली, दि. २० सप्टेंबर २०२६ : स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांच्या हक्क, सन्मान व सामाजिक प्रतिष्ठेसाठी देशव्यापी संघटनात्मक लढा उभारण्याचा निर्धार स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवार समिती (रजि.), गैरराजनैतिक संघटना यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील संघटनेचे कार्य विस्तारण्यामध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल निलेशभई कोठारी यांची महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी, तर कबीरभाई तांबोळी यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

प्रेस क्लब ऑफ इंडिया, रायसीना रोड, नवी दिल्ली येथे झालेल्या अर्धवार्षिक राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीस देशातील २१ राज्यांमधून ४२ राष्ट्रीय व प्रादेशिक प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष देशबंधूजी होते. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष द्विजेंद्र मोहन शर्मा, राष्ट्रीय महासचिव जितेंद्र रघुवंशी, कार्यकारी महासचिव चंद्रप्रकाश वाजपेई, राष्ट्रीय संघटन सचिव कपूर सिंह दलाल यांच्यासह विविध राज्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.

पाच कोटी उत्तराधिकाऱ्यांना एका व्यासपीठावर आणण्याचा संकल्प

राष्ट्रीय महासचिव जितेंद्र रघुवंशी यांनी संघटनेच्या आगामी कार्याचा आढावा घेत देशभरातील स्वातंत्र्यसैनिक परिवारांपर्यंत पोहोचण्याची गरज व्यक्त केली. देशातील सुमारे पाच कोटी उत्तराधिकाऱ्यांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी व्यापक जनसंपर्क व संघटन विस्तार अभियान राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

सध्या संघटना २३ राज्यांमध्ये सक्रिय असून स्वातंत्र्यसैनिक परिवारांच्या सन्मान, अधिकार व हितासाठी तसेच सामाजिक व जनहिताच्या विविध उपक्रमांसाठी कार्यरत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

महाराष्ट्रासाठी विविध मागण्यांचा पाठपुरावा करणार

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर निलेशभई कोठारी यांनी महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवारांना इतर राज्यांप्रमाणे सुविधा व सन्मान मिळावा, अशी भूमिका मांडली.

स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवारांना ‘राष्ट्रीय वारसा’ म्हणून घोषित करावे, मानधन व विविध सवलती सुरू कराव्यात, एसटी व रेल्वे प्रवासात मोफत सुविधा द्यावी, जमीन व निवासासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, घरपट्टी-पाणीपट्टीसह स्थानिक करांमध्ये सवलत द्यावी, ओळखपत्रे देण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी केली.

Advertisemen

तसेच स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवारांच्या आर्थिक विकासासाठी स्वातंत्र्यसैनिक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, आरोग्य उपचार मोफत उपलब्ध करून द्यावेत, शैक्षणिक शुल्क माफ करावे, वसतिगृहांमध्ये जागा राखीव ठेवाव्यात तसेच केंद्र व राज्य शासनातील सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद करावी, अशा विविध मागण्या त्यांनी मांडल्या.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची जबाबदारी

महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवारांच्या मागण्यांसाठी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्याची जबाबदारी निलेशभई कोठारी यांच्यावर सोपविण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

निलेशभई कोठारी यांचा गौरव

स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आणि गांधीवादी विचारांची जनजागृती करण्यासाठी निलेशभई कोठारी यांनी गावोगावी जाऊन कार्य केले. पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

बैठकीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील गोपालदास गुजराती यांनाही नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. आसाम युनिटच्या वतीने पारंपरिक ‘पटका’ परिधान करून पदाधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

राष्ट्रीय अध्यक्ष देशबंधूजी यांनी स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग, राष्ट्रप्रेम, संघर्ष आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.

बैठकीस मृगांक शेखर आनंद, चंद्रप्रकाश वाजपेई, सुबेदार विजेंद्र सिंह, ए. वेद रत्नम, ओमप्रकाश मांझी, कमलचंद्र लहकर, मोनोतोष दास, माल रेड्डी राजशेखर, कपूर सिंह दलाल, अनुराग सिंह गौतम, आदित्य कुमार गहलोत, राजेश प्रताप सिंह, परमजीत सिंह टीवाना, सुषमा शर्मा, निलेशभई कोठारी, कबीर तांबोळी, डॉ. अमरनाथ, दिव्याकांत झा, डॉ. उषा किरण बाजपेई, दीपा दास, आदित्य प्रताप सिंह रघुवंशी यांच्यासह विविध राज्यांतील पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

बैठकीचा समारोप राष्ट्रगीताने झाला. येत्या २६ ऑक्टोबर रोजी अमरकंटक येथे होणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक संमेलनास देशभरातील परिवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »