शेळगावात गुटखा आणि विदेशी दारूचा साठा जप्त; 2.53 लाखांचा मुद्देमाल हस्तगत


शेळगावात गुटखा आणि विदेशी दारूचा साठा जप्त; 2.53 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

इंदापूर : शेळगाव परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू तसेच विदेशी दारू आणि बिअर असा एकूण ₹2 लाख 53 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी किरण ज्ञानदेव मोहिते (वय 33, रा. शेळगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वालचंदनगर पोलिसांच्या हद्दीत 24 सप्टेंबर 2026 रोजी पेट्रोलिंग सुरू असताना पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शेळगाव येथील एका शेतातील पत्र्याच्या खोलीत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाला, तंबाखू तसेच दारूचा साठा ठेवण्यात आला आहे.

माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचांना सोबत घेत संबंधित ठिकाणी छापा टाकला. घटनास्थळी किरण मोहिते आढळून आल्याचे FIR मध्ये नमूद आहे. पोलिसांनी पत्र्याच्या खोलीची झडती घेतली असता पांढऱ्या रंगाच्या गोण्या आणि खाकी रंगाचे बॉक्स आढळले.

Advertisemen

पोलिसांच्या नोंदीनुसार, या साठ्यामध्ये विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू तसेच रॉयल चॅलेंज, मॅकडॉवेल, ब्ल्यू स्पेशल, इम्पीरियल ब्लू, क्लासिक गोल्ड आणि रॉयल स्टॅग यांसारख्या विदेशी मद्याच्या बाटल्या तसेच किंगफिशर स्ट्राँग बिअरचा समावेश होता.

जप्त मुद्देमालामध्ये प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची किंमत ₹2 लाख 24 हजार 480, तर विदेशी दारू व बिअरची किंमत ₹28 हजार 890 असल्याचे FIR मध्ये नमूद आहे. अशा प्रकारे एकूण ₹2 लाख 53 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जप्त केलेल्या पदार्थांमधून तपासणीसाठी नमुने वेगळे काढण्यात आले असून, त्यावर पंच व पोलिसांच्या स्वाक्षरीची लेबले लावण्यात आली आहेत. तसेच पुढील पंचनामा व कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 123, 223, 274, 275, अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 मधील संबंधित कलमे तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65(e) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश रंगनाथ घोरपडे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »