बीड जिल्ह्यातील अर्धमसला मस्जिद स्फोट: आरोपींवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे अल्पसंख्याक आयोगाचे निर्देश
बीड: बीड जिल्ह्यातील अर्धमसला गावात एका मस्जिदमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणी राज्य अल्पसंख्याक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाचे अध्यक्ष वसीम बुऱ्हाण यांनी बीडचे पोलीस अधीक्षक यांना तात्काळ या स्फोटातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेषतः, आरोपींवर बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश आयोगाने दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्धमसला गावातील एका मस्जिदमध्ये काही दिवसांपूर्वी अज्ञात कारणांमुळे स्फोट झाला होता. या स्फोटामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच राज्य अल्पसंख्याक आयोगाने तातडीने कार्यवाही करत पोलीस प्रशासनाला कठोर पाऊले उचलण्याचे आदेश दिले आहेत.
अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष वसीम बुऱ्हाण यांनी सांगितले की, “मस्जिदमध्ये झालेला स्फोट ही गंभीर आणि निंदनीय घटना आहे. यामुळे धार्मिक सलोख्याला बाधा पोहोचू शकते. त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे. आम्ही पोलीस अधीक्षकांना निर्देश दिले आहेत की, या प्रकरणाचा कसून तपास करावा आणि आरोपींवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करावा.” आयोगाच्या या निर्देशानंतर बीड पोलीस प्रशासन काय कारवाई करते, याकडे आता लक्ष लागलेले आहे. या स्फोटामुळे अर्धमसला आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या घटनेमुळे राज्यातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने आणि प्रभावी पाऊले उचलणे गरजेचे आहे, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.


