बारामतीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तयारीची मागणी
बारामती: महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल रोजी येणारा जन्मदिन केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बारामती शहरातही नागरिक विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त करतात.
या पार्श्वभूमीवर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने बारामती शहरातील अनुसूचित जातीतील वस्त्यांमधील बौद्ध विहार, सामाजिक सभागृह, समाज मंदिर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम यांसारख्या नगरपालिकेच्या मालकीच्या सर्व वास्तूंची तातडीने रंगरंगोटी, दुरुस्ती करून विद्युत रोषणाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या शिष्टमंडळाने बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी मा. पंकज भुसे साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना याबाबतचे निवेदन सादर केले.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष मा. रत्नप्रभा ताई साबळे, पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष मा. रविंद्र (पप्पू) सोनवणे आणि सामाजिक कार्यकर्ते मोईन बागवान उपस्थित होते. त्यांनी जयंतीच्या पार्श्वभूमीवर या सर्व वास्तूंची सुधारणा आणि सुशोभीकरण लवकरात लवकर करण्याची आवश्यकता व्यक्त केली.


