मुंबईतील ५० लाखांच्या ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीला बारामती तालुका पोलिसांकडून अटक


बारामती तालुका पोलिसांची मोठी कारवाई; वसईतील ‘एम.डी. ड्रग्स’ प्रकरणातील आरोपीला ठोकल्या बेड्या

बारामती: तब्बल ५० लाख रुपयांच्या ‘एम.डी. ड्रग्स’ प्रकरणात फरार असलेल्या एका आरोपीला बारामती तालुका पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. हा आरोपी बारामती परिसरात लपून बसला असल्याची माहिती मिळाल्यानंतर बारामती पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली आहे.
पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालयाच्या हद्दीतील तुळींज पोलीस ठाण्यात (नालासोपारा ईस्ट) दि. १४ सप्टेंबर रोजी एनडीपीएस कायदा १९८५ सह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात शहबाज हमीद शेख, योगेश राजू राठोड, जफर आसिफ शेख, बाबू शेख आणि समीर शेख यांच्यावर कारवाई सुरू होती. यातील समीर उर्फ नूर मोहम्मद अस्लम शेख (वय २०, रा. वसई) हा आरोपी तेव्हापासून फरार होता.
समीर उर्फ नूर मोहम्मद अस्लम शेख हा बारामती परिसरात लपून बसल्याची माहिती वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील पोलिसांनी बारामती तालुका पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे, बारामती तालुका पोलिसांनी पथक तयार करून शोधमोहीम सुरू केली. आरोपी बारामती शहरात वास्तव्यास असून ‘ब्रँड रिव्हर’ नावाच्या कपड्याच्या दुकानात कामाला असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार, बारामती तालुका पोलिसांच्या पथकाने अत्यंत हुशारीने नियोजन करून त्या दुकानावर लक्ष ठेवले आणि आरोपीची ओळख पटवताच क्षणाचाही विलंब न करता त्याला ताब्यात घेतले. बारामती पोलिस ठाण्यात चौकशी केली असता, त्याने तुळींज पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याची कबुली दिली.
या यशस्वी कारवाईनंतर बारामती तालुका पोलिसांनी तात्काळ मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयास माहिती दिली. पुढील तपासासाठी आरोपीस तुळींज पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राख, पोलीस हवालदार कांबळे आणि पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले आहे.
ही महत्वपूर्ण कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, स.पो.नि. विक्रम पवार, सहाय्यक फौजदार सुरेंद्र वाघ, सुरेश बडे, आणि पोलीस अंमलदार निलेश वाकळे, राहुल लांडगे यांच्या पथकाने पार पाडली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »