बारामतीत बुलेट चोरीचे सत्र; संशयितांचे CCTV फुटेज पोलिसांच्या हाती
बारामतीत बुलेट चोरीचे सत्र; संशयितांचे CCTV फुटेज पोलिसांच्या हाती
बारामती | दि. ११ ऑगस्ट २०२६ : बारामती शहर व परिसरात रॉयल एनफिल्ड बुलेट मोटारसायकली चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, मागील काही दिवसांत बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन तर बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन अशा एकूण सहा बुलेट चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बुलेटला लक्ष्य करणारी चोरट्यांची टोळी सक्रिय असण्याची शक्यता असून, पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.
बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गु.र.नं. ३१७/२०२६ या गुन्ह्यात ६ ऑगस्टच्या रात्री १० वाजल्यापासून ७ ऑगस्टच्या सकाळी १० वाजेपर्यंत प्रगतीनगर येथील प्रभावती अपार्टमेंटच्या पार्किंगमधून दोन रॉयल एनफिल्ड मोटारसायकली चोरीला गेल्या. यामध्ये MH-42/AV-2121 क्रमांकाची Classic 350 आणि MH-42/BK-0749 क्रमांकाची Hunter 350 असून, दोन्ही वाहनांची अंदाजे किंमत २ लाख ६० हजार रुपये आहे.
त्यानंतर गु.र.नं. ३२४/२०२६ या गुन्ह्यात ९ ऑगस्टच्या रात्री ११ ते १० ऑगस्टच्या सकाळी ७ या कालावधीत तांदुळवाडी रोडवरील के-मार्टच्या पाठीमागील प्रगतीनगर येथील आर्या पॅराडाईस अपार्टमेंटच्या पार्किंगमधून MH-42/BK-9709 क्रमांकाची मेटल ग्रे रंगाची Royal Enfield Classic 350 चोरीला गेली. या मोटारसायकलीची अंदाजे किंमत १ लाख १० हजार रुपये आहे.
दरम्यान, या घटनांच्या तपासासाठी बारामती शहर पोलिसांनी परिसरातील विविध ठिकाणचे CCTV फुटेज ताब्यात घेतले असून, त्याचे बारकाईने विश्लेषण सुरू आहे. संशयितांच्या हालचालींबाबत पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली असून, त्यांच्या शोधासाठी तपास पथके कार्यरत करण्यात आली आहेत.
प्राथमिक तपासात अपार्टमेंट, सोसायट्या तसेच कमी वर्दळीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बुलेट मोटारसायकली चोरट्यांकडून लक्ष्य केल्या जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहनधारकांनी केवळ हॅण्डल लॉकवर अवलंबून न राहता अतिरिक्त सुरक्षा साधनांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
वाहनधारकांनी डिस्क लॉक, व्हील लॉक किंवा चेन लॉकचा वापर करावा, शक्य असल्यास वाहन सुरक्षित लोखंडी संरचनेला बांधावे, तसेच CCTV कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आणि प्रकाश असलेल्या ठिकाणी वाहने पार्क करावीत, असे पोलिसांनी सांगितले आहे. वाहनांमध्ये GPS ट्रॅकर किंवा चोरीविरोधी अलार्म बसविण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
तसेच वाहनाची RC, इंजिन नंबर, चॅसी नंबर आणि वाहनाचे छायाचित्र मोबाईलमध्ये सुरक्षित ठेवावे. अनोळखी व्यक्तींकडून कमी किमतीत बुलेट किंवा तिचे सुटे भाग विक्रीसाठी देण्यात येत असल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बुलेट चोरीच्या घटनांचा बारामती शहर पोलिसांकडून गांभीर्याने तपास सुरू असून CCTV फुटेज, तांत्रिक माहिती आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी संशयास्पद व्यक्ती किंवा वाहन आढळल्यास तात्काळ बारामती शहर पोलीस ठाणे किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.


