रुग्णवाहिकांचे सुधारित भाडेदर लागू; जादा आकारणी केल्यास दंडात्मक कारवाई


रुग्णवाहिकांचे सुधारित भाडेदर लागू; जादा आकारणी केल्यास दंडात्मक कारवाई

पुणे, दि. ११ : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात रुग्णवाहिकांसाठी सुधारित भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत. हे दर रुग्णवाहिकेत रुग्ण बसल्यापासून परतीच्या अंतरासाठी लागू राहणार आहेत. निश्चित केलेल्या दरपत्रकापेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या रुग्णवाहिका चालक व मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली.

सुधारित दरानुसार अवातानुकूलित मारुती व्हॅनसाठी २५ किलोमीटर अथवा दोन तासांसाठी ७०० रुपये, त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १६ रुपये आणि प्रतीक्षा शुल्क १२५ रुपये प्रतितास राहणार आहे. प्रतिदिन अथवा ३०० किलोमीटरसाठी ४ हजार रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.

अवातानुकूलित मारुती ईको व टाटा मॅजिकसाठी २५ किलोमीटर अथवा दोन तासांसाठी ९०० रुपये, त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १७ रुपये आणि प्रतीक्षा शुल्क १२५ रुपये प्रतितास राहणार आहे. प्रतिदिन अथवा ३०० किलोमीटरसाठी ४ हजार ५०० रुपये दर आहे.

Advertisemen

अवातानुकूलित महिंद्रा बोलेरो व फोर्स क्रुझरसाठी २५ किलोमीटर अथवा दोन तासांसाठी १ हजार २०० रुपये, त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १८ रुपये आणि प्रतीक्षा शुल्क १५० रुपये प्रतितास आहे. प्रतिदिन अथवा ३०० किलोमीटरसाठी ५ हजार रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.

अवातानुकूलित फोर्स टेम्पो ट्रॅव्हलरसाठी २५ किलोमीटर अथवा दोन तासांसाठी १ हजार ५०० रुपये, त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २२ रुपये आणि प्रतीक्षा शुल्क १७५ रुपये प्रतितास राहणार आहे. प्रतिदिन अथवा ३०० किलोमीटरसाठी ७ हजार रुपये दर आहे.

तर वातानुकूलित फोर्स टेम्पो ट्रॅव्हलर (आयसीयू) साठी २५ किलोमीटर अथवा दोन तासांसाठी २ हजार ५०० रुपये, त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी ३० रुपये आणि प्रतीक्षा शुल्क २५० रुपये प्रतितास निश्चित करण्यात आले आहे. प्रतिदिन अथवा ३०० किलोमीटरसाठी १० हजार रुपये दर लागू राहणार आहे.

जादा भाडे आकारल्यास हजारोंचा दंड

निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त रक्कम आकारल्याचे आढळल्यास संबंधित वाहनमालक किंवा चालकावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पहिल्या गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये, दुसऱ्या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये, तर तिसऱ्या आणि त्यानंतरच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी २० हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

रुग्णवाहिका चालक व मालकांनी निश्चित केलेल्या दरपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »