लासुर्णेत रमी जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त; पोलिसांचा धडाका, सहा जणांवर गुन्हा
लासुर्णेत रमी जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त; पोलिसांचा धडाका, सहा जणांवर गुन्हा
इंदापूर : लासुर्णेच्या कोळेकर मळ्यात पैसे लावून खुलेआम रमी जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळताच वालचंदनगर पोलिसांनी धडक कारवाई करत जुगाराचा अड्डाच उद्ध्वस्त केला. पोलिसांच्या छाप्यात सहा जणांना पकडण्यात आले असून, रोख रकमेसह पाच दुचाकी आणि जुगाराचे साहित्य असा तब्बल १ लाख ७ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता वालचंदनगर पोलिसांचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी लासुर्णे येथील कोळेकर मळ्यात एका पत्र्याच्या शेडजवळ काही जण पैसे लावून रमी जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी पंचांना सोबत घेत घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी पोहोचताच सहा जण पत्ते खेळताना पोलिसांच्या नजरेस पडले. पोलिसांनी अचानक छापा टाकत सर्वांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून १७ हजार ६२० रुपये रोख, दोन ५३ पानी पत्त्यांचे कॅट, बॉलपेन आणि जुगाराच्या आकडेमोडीचा कागद असा मुद्देमाल मिळून आला.
पोलिसांनी केवळ रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्यच नाही, तर जुगाराच्या ठिकाणी आढळलेल्या पाच दुचाकी वाहनांवरही कारवाईचा हातोडा मारला. या वाहनांची एकत्रित किंमत ९० हजार रुपये असून, रोख रकमेसह जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १,०७,६२० रुपये असल्याचे FIR मध्ये नमूद आहे.
या प्रकरणी सहा जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ मधील कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार अमोल मोहन गायकवाड करीत आहेत.
जुगाराच्या अड्ड्यांवर पोलिसांची नजर असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले असून, अशा अवैध प्रकारांविरोधात आणखी कारवाया होणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.


