लग्नाचे आमिष दाखवून महिला वकिलाची फसवणूक; पोलीस हवालदाराविरुद्ध बारामतीत गंभीर गुन्हा


लग्नाचे आमिष दाखवून महिला वकिलाची फसवणूक; पोलीस हवालदाराविरुद्ध बारामतीत गंभीर गुन्हा

बारामती, दि. २८ जुलै : लग्नाचे खोटे आश्वासन देत एका महिला वकिलाची फसवणूक, लैंगिक शोषण, आर्थिक गैरफायदा आणि धमकावल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात बारामती शहर पोलीस ठाण्यात एका पोलीस हवालदाराविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, खडकी (पुणे) येथे कार्यरत असलेला पोलीस हवालदार रमेश मोहन जाधव (बकल क्र. ५६१) याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक २९७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६९, ८१, ३५१(२), ३५१(३) व ३१८ अंतर्गत २७ जुलै २०२६ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फिर्यादी महिला व्यवसायाने वकील असून, सन २०२४ मध्ये न्यायालयीन कामकाजादरम्यान आरोपीशी तिची ओळख झाली. त्यानंतर आरोपीने स्वतःचे वैवाहिक जीवन संपुष्टात आल्याचे सांगत लग्नाचे आश्वासन देऊन तिचा विश्वास संपादन केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

तक्रारीनुसार, २८ डिसेंबर २०२४ रोजी आरोपीने बारामती येथे आर्थिक अडचणीचे कारण सांगून फिर्यादीकडून ₹४० हजार घेतले. त्याच दिवशी एका लॉजमध्ये नेऊन लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यानंतर आरोपीने नातेवाईकांसह फिर्यादीच्या घरी जाऊन विवाहाबाबत चर्चा केली. तसेच एका मंदिरात साखळी गळ्यात घालून “आता तू माझी कायदेशीर पत्नी आहेस” असे सांगत काही काळ सहजीवन केल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.

Advertisemen

सहजीवनादरम्यान फिर्यादी गर्भवती राहिली. मात्र त्यानंतर आरोपीचे वर्तन बदलले असून तिची जबाबदारी न स्वीकारणे, मानसिक त्रास देणे आणि उपचारासाठी मदत न केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. २० डिसेंबर २०२५ रोजी फिर्यादीला कन्यारत्न प्राप्त झाले. ही मुलगी आरोपीपासून झाल्याचा दावा करत आरोपीने मुलीचा स्वीकार करण्यास नकार दिला तसेच कोणतीही आर्थिक मदत केली नसल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.

तसेच आरोपीने वेळोवेळी फिर्यादी व तिच्या नातेवाईकांकडून रोख व ऑनलाइन स्वरूपात पैसे घेतल्याचा, त्यापैकी मोठी रक्कम परत न केल्याचा तसेच तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकून धमक्या दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात मोबाईल कॉल रेकॉर्ड, व्हॉट्सअॅप चॅट, छायाचित्रे, व्हिडिओ, लॉजची नोंद, सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय कागदपत्रे, बँक व्यवहार आणि इतर डिजिटल व दस्तऐवजीय पुराव्यांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बारामती शहर पोलीस ठाणे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, सर्व तांत्रिक, वैज्ञानिक आणि दस्तऐवजीय पुराव्यांच्या आधारे निष्पक्ष तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

टीप : पीडित महिलेची ओळख कायदेशीर कारणास्तव गोपनीय ठेवण्यात आली आहे. या वृत्तातील सर्व आरोप हे फिर्यादीच्या तक्रारीवर आधारित असून त्यांची सत्यता तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच निश्चित होणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »