सावधान ! देवगड (रत्नागिरी) हापूस आंब्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक; कर्नाटकी आंब्याची होतेय विक्री?
बारामती : देवगड (रत्नागिरी) हापूस आंब्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. काही व्यापारी देवगड हापूस सांगून कर्नाटकी हापूस ग्राहकांच्या माथी मारत आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही व्यापारी ओरिजनल देवगड हापूसची विक्री करीत आहेत बाजारपेठेत अनेक व्यापारी देवगडच्या नावाखाली कर्नाटकी आंबा विक्री करीत आहेत. फळांचा राजा म्हणून देशासह परदेशात रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याने नावलौकिक मिळविला आहे. नावलौकीकाबरोबर रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याला जीआय (भौगोलिक उपदर्शन) हे गुणवत्तेचे मानांकन मिळाले आहे. बाजारपेठेमध्ये आंब्यांचा हंगाम बहरला असून, कोकणातील हापूससह परराज्यांतील विविध जातींच्या आंब्यांची आवक वाढली आहे. मात्र, अनेक व्यापारी व विक्रीते ग्राहकांची फसवणूक करीत परराज्यांतील आंब्यांची रत्नागिरी, देवगड हापूस आंब्यांच्या नावाने विक्री करीत आहेत. या फसवणुकीस आळा बसण्यासाठी फसवणूक करणाऱ्या व्यापारी व विक्रीत्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे गरजेचे असताना कोणत्याही कारवाई होताना दिसून येत नाही. कारवाई होत नसल्याने बाजारपेठेमध्ये राजरोसपणे कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेशातील आंब्यांची देवगड, रत्नागिरी हापूसच्या बॉक्समध्ये भरून विक्री केली जात आहे.
बारामतीमध्ये परप्रांतीयांचा सुळसुळाट , कारवाई कधी?
बारामतीमध्ये बाहेरून आलेल्या आंबा विक्री करणाऱ्या परप्रांतीय व्यापाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. या व्यापाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना बारामती नगरपालिका हद्दीत अतिक्रमण करून फुटाफुटावर रस्त्यावर दुकाने थाटली आहेत. परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून देवगड (रत्नागिरी) हापूस आंबा लिहलेले स्टिकर व बॉक्स रस्त्यावर लावण्यात येत आहेत. परंतु त्यामध्ये आंबा कर्नाटक हापूस असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे. नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे , आंबा खेरीदी करताना काळजीपूर्वक करावा जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही.
का करतात फसवणूक ?
देवगड (रत्नागिरी) हापूस दर कर्नाटक हापूस पेक्षा जास्त असल्याने जास्त नफा मिळवण्यासाठी फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. देवगड (रत्नागिरी) हापूस आंब्याचा सद्यस्थितीत दर सरासरी पाचशे, सहाशे ते सातशे रुपये प्रति डझन आहे. कर्नाटकी हापूस आंब्याची विक्री प्रति डझन तीनशे रुपयांच्या आतमध्ये विक्री केली जात आहे. एवढी मोठी तफावत यामध्ये आहे. संबंधित व्यापाऱ्यांकडे देवगड (रत्नागिरी) हापूस आंबा लिहलेले स्टिकर त्या बॉक्सवर लावण्यात येत आहेत. काही व्यापारी ओरिजनल देवगड हापूस आंब्याची विक्री करीत आहेत. या आंब्याचे दर कर्नाटक हापूस पेक्षा जास्त आहेत. ज्या नागरिकांना ओरिजनल हापूस आंबा खायचा आहे त्यांनी काळजीपूर्वक आंबा खरेदी करणे आवश्यक आह. देवगड हापूस आंब्याची झाडे ही जांभ्या खडकात लाल मातीमध्ये असतात.
कसा ओळखला जातो देवगड (रत्नागिरी) हापूस व कर्नाटक हापूस या मधला फरक नेमका काय ?
खारे वारे लागल्यामुळे व पोषक वातावरण लाभल्याने देवगड (रत्नागिरी) हापूस आंब्याला विशिष्ट चव प्राप्त होते. काही जानकार नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार देवगड हापूस आंबा चिरल्यानंतर तो आतमध्ये केसरी रंगाचा आहे तर कर्नाटकी हापूस आंबा पिवळसर रंगाचा आहे. देवगड हापूस आंब्याची साल पातळ असते. कर्नाटकी हापूस आंब्याची साल जाड असते. तसेच देवगड हापूस आंबा पिवळसर व त्यावर हिरव्या रंगाच्या छटा असतात. कर्नाटकी हापूस आंबा पूर्णपणे गडद पिवळ्या रंगाचा असतो. देवगड हापूस आंब्याच्या कर्नाटकी हापूस आंब्याची विक्री ही कर्नाटकच्या नावानेच झाली पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रात कर्नाटकी हापूस आंबा मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे. तो आंबा देवगड आहे असे दाखवून विकला जात आहे. याची चौकशी होणे आवश्यक आहे.