बारामतीत ‘सैराट’ रोखले: ॲड. धर्मपालदादा मेश्राम यांच्या तत्परतेने गुन्हा दाखल
बारामती : पुणे जिल्ह्यातील भोर येथील विक्रम गायकवाड या तरुणाच्या आंतरजातीय विवाहामुळे झालेल्या खुनाच्या घटनेनंतर, बारामतीतही अशाच प्रकारची घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपालदादा मेश्राम यांच्या तत्परतेने संभाव्य ‘सैराट’ टळले.
माळेगाव येथे लक्ष्मण राजेंद्र भोसले या उच्चशिक्षित बौद्ध तरुणाने आंतरजातीय विवाह केला. यानंतर, नातेपुते (माळशिरस) येथील काही लोकांनी भोसले व त्यांच्या पत्नीचे अपहरण करून त्यांना मारहाण केली. तसेच, लक्ष्मण भोसले यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या पत्नीला जबरदस्तीने त्यांच्यापासून वेगळे केले. या घटनेबाबत भोसले यांनी ॲड. अक्षय गायकवाड यांच्यामार्फत अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे तक्रार दाखल केली. मात्र, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, बारामती व सासवड उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही दखल घेण्यात आली नाही.
यानंतर, ॲड. धर्मपालदादा मेश्राम यांनी पुणे जिल्ह्याचा दौरा करून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेतले. त्यांनी बारामतीत तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, १ मार्च २०२५ रोजी गुन्हा दाखल झाला असून, सासवड उपविभागीय अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
गुन्ह्याची माहिती:
– भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०23 नुसार विविध कलमे
– अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ नुसार विविध कलमे
लक्ष्मण भोसले व त्यांची पत्नी २०१ पासून कॉलेजमध्ये शिकत होते. त्यांचे प्रेमसंबंध होते. २४ डिसेंबर २०२४ रोजी त्यांनी आळंदी येथे विवाह केला. घरी परतत असताना त्यांचे अपहरण करून मारहाण करण्यात आली. तसेच, त्यांच्या डोक्याला बंदूक लावून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ॲड. धर्मपालदादा मेश्राम यांच्या आदेशानुसार तात्काळ गुन्हा दाखल झाला आहे. आयोगाच्या आदेशानुसार, या प्रकरणाचा तातडीने तपास केला जाईल. तसेच, आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत.