आमराईच्या इतिहासात मानाचा तुरा; मुस्लिम समाजातील पहिली महिला पोलीस म्हणून आयेशा शेखचा गौरव!
खाकी वर्दीचे स्वप्न साकार! बारामतीच्या आयेशा शेखचा आमराई मुस्लिम समाजाकडून जंगी सत्कार.
बारामती : “जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अशक्य गोष्टीही शक्य होतात,” हे बारामतीतील आमराई परिसरातील कन्या आयेशा मुक्कदर शेख हिने सिद्ध करून दाखवले आहे. आयेशाची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल शुक्रवारी (१० एप्रिल) समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने तिचा जंगी सत्कार आणि ‘गुलपोशी’ करण्यात आली. आमराई परिसरातून पोलीस दलात निवड झालेली ती पहिलीच मुस्लिम महिला ठरल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे उधाण आले आहे.
हजरत राजबाग सवार दर्गा परिसरात उत्साहाचे वातावरण
आयेशाच्या या ऐतिहासिक यशाबद्दल तिचा गौरव करण्यासाठी आमराईतील हजरत राजबाग सवार दर्गा मशीद परिसरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी जुम्माच्या नमाजानंतर हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी आमराई परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ व्यक्ती आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजासाठी ठरली प्रेरणास्थान
एका सामान्य कुटुंबातील पार्श्वभूमी असलेल्या आयेशाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले ध्येय गाठले आहे. “आमच्या भागातील मुली जेव्हा अशा प्रकारे सरकारी सेवेत उच्च पदावर जातात, तेव्हा समाजाची मान उंचावते,” अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. मुस्लिम समाजातील तरुणांसाठी, विशेषतः मुलींसाठी आयेशा आता एक मोठी प्रेरणा ठरली आहे.
यशाचे श्रेय आई-वडिलांना
सत्काराला उत्तर देताना आयेशा शेख भावूक झाली होती. तिने आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आपल्या आई-वडिलांचे कष्ट आणि समाजाकडून मिळालेल्या खंबीर पाठिंब्याला दिले. सर्व बांधवांनी एकत्र येत तिची केलेली ‘हौसला अफजाई’ पाहून तिने सर्वांचे आभार मानले.
या सोहळ्यामुळे केवळ आमराई परिसरातच नव्हे, तर संपूर्ण बारामती शहरात आयेशाच्या चिकाटीचे कौतुक होत आहे. तिच्या या निवडीमुळे पोलीस दलात सेवा बजावण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक गरजू मुलींना नवी उमेद मिळाली आहे.


