महासंस्कृती महोत्सव २०२४ चे बारामती येथे शानदार उद्घाटन
बालनाट्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बारामती, दि.२७: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षाचे औचित्य साधून शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासनाच्यावतीने गदिमा सभागृह बारामती येथे आयोजित महासंस्कृती महोत्सवाचे तहसीलदार गणेश शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे उपस्थित होते.
महोत्सवाअंतर्गत होणारे सर्व कार्यक्रम दर्जेदार व विनामूल्य असून अधिकाधिक नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.शिंदे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षाचे औचित्य साधून बारामती येथे महासंस्कृती महोत्सवाचे २८ ते ३ मार्च या कालावधीत पाच दिवसीय विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे श्री. रोकडे यांनी सांगितले.
उद्घाटन प्रसंगी ‘गजरा नाट्य छटांचा’ या बालनाट्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. क्लाऊन माईम ॲक्टलाही चांगला प्रतिसाद मिळाला.
रसिकांना ३ मार्चपर्यंत विविध कार्यक्रमांची मेजवानी
बारामती येथे २९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते ११ या वेळेत ‘यदा कदाचित रिटर्न्स’ नाटक, १ मार्च रोजी सायं. ४ ते रात्री ८ या वेळेत विनाशलीला, ना ना नाना, चाहूल या एकांकिका, रात्री ८ ते ११ या वेळेत ‘तुझी आठवण’ हा कार्यक्रम, २ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ‘बोक्या सातबंडे’ हे नाटक, दुपारी २ ते सायं. ५ या वेळेत लाली, भुताचं भविष्य, लेबल या एकांकिका आणि सायं ५ ते रात्री ९ या वेळेत ‘गीत रामायण’ तर ३ मार्च रोजी दुपारी ३ ते रात्री ७ यावेळेत नेकी, मजार, बी अ मॅन या एकांकिका आणि रात्री ८ ते ११ यावेळेत शिवदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.