बारामतीला देशातील सर्वात सुंदर शहर बनविणार; नगराध्यक्ष सचिन सातव यांची ग्वाही


बारामती: शहरातील नागरिकांना सर्वोच्च प्राधान्य देऊन, मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसोबतच बारामतीचा नावलौकिक वाढवण्यासाठी सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन मनापासून काम करू, अशी ग्वाही नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन सातव यांनी दिली.
गुरुवारी (ता. १) सचिन सातव यांनी बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या आगामी पाच वर्षांतील कामाचा रोडमॅप स्पष्ट केला. यावेळी मुख्याधिकारी पंकज मुसे आणि सर्व सहकारी नगरसेवक उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न पूर्ण करणार
पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना सातव म्हणाले, “बारामतीच्या जनतेने दाखवलेला विश्वास माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांचे बारामतीला देशातील सर्वात सुंदर शहर करण्याचे स्वप्न आहे. ही संधी सार्थ ठरवण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक जिवाचे रान करू.”

विकासाचे प्रमुख मुद्दे आणि प्राथमिकता:   

Advertisemen

• मूलभूत सुविधा: स्वच्छता, पुरेसे पिण्याचे पाणी, खड्डेमुक्त रस्ते आणि आरोग्य-शिक्षण यावर विशेष भर दिला जाईल.
• नवे प्रकल्प: उपनगरांमध्ये भुयारी गटार योजना, घनकचरा व्यवस्थापन आणि पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील.
• झोपडपट्टीमुक्त बारामती: अजितदादांच्या संकल्पनेतील ‘झोपडपट्टीमुक्त बारामती’ करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.
• डिजिटल प्रशासन: प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवून, ‘एआय’ (AI) आणि मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य दिले जाईल.

महिला व युवकांसाठी विशेष योजना
महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी महिला नगरसेविकांच्या मदतीने प्रत्येक प्रभागात संवाद साधला जाईल. सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना स्वयंरोजगार आणि प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाईल. तसेच, एनसीसी (NCC), एनएसएस (NSS) आणि स्काऊट गाईडच्या माध्यमातून युवकांना शहराच्या विकासात सहभागी करून घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘लोकसहभाग’ आणि ‘स्वच्छता’ यावर भर
“इंदूरच्या धर्तीवर बारामतीला स्वच्छ आणि हरित शहर बनवण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. निवडणुकीचे राजकारण बाजूला ठेवून सर्व घटकांना सोबत घेऊन शहराचा समतोल विकास साधला जाईल,” असे सातव यांनी स्पष्ट केले.
शेवटी, बारामतीकरांनी शहर सुशोभीकरण आणि स्वच्छतेमध्ये स्वतःहून पुढाकार घ्यावा, असे आवाहनही नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »