पार्किंगच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या टोळक्याचा मुख्य सूत्रधार तन्मेष साळुंखे गजाआड; बारामती तालुका पोलिसांची कारवाई
बारामती: येथील भिगवण रोडवरील हॉटेल वृंदावन समोर केवळ वाहन पार्किंगच्या किरकोळ कारणावरून तरुणावर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला करणाऱ्या प्रकरणातील मुख्य आरोपी तन्मेष सुधीर साळुंखे याला बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या साळुंखेला पोलिसांनी १३ जानेवारी रोजी ताब्यात घेतले असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, २९ नोव्हेंबर रोजी तानाई नगर येथील रहिवासी मानस दीपक पाटील हे आपल्या काही मित्रांसह जेवणासाठी हॉटेल वृंदावन येथे गेले होते. हॉटेलच्या बाहेर वाहन पार्क करण्याच्या कारणावरून त्यांचा तन्मेष साळुंखे आणि त्याच्या साथीदारांशी वाद झाला. या वादाचे पर्यवसान भीषण हाणामारीत झाले. आरोपी तन्मेष साळुंखे, राम लोखंडे, माउली रणदिवे, ओंकार भोसले आणि त्यांच्या इतर १० ते १२ साथीदारांनी बेकायदेशीर जमाव जमवून मानस पाटील यांच्यावर हल्ला चढवला.
आरोपींनी दगड आणि लोखंडी गजाचा वापर करून मानस यांच्या डोक्यात गंभीर दुखापत केली आणि त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यादरम्यान आरोपींनी एका पिकअप गाडीतून येत मानस यांच्या मित्रांनाही बेदम मारहाण केली. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. घटनेनंतर बारामती तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी यापूर्वी राम अनिल लोखंडे (वय २४) याला अटक केली होती, मात्र मुख्य आरोपी तन्मेष साळुंखे फरार होता. पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी फरार आरोपींना पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तन्मेष साळुंखेचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, हवालदार मनोज पवार, सागर देशमाने, भारती खंडागळे, पोलीस अंमलदार राजू बन्ने व दादा दराडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. “बारामती तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नाही आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील आणि राजू बन्ने करत आहेत.

