‘बारामती संचार’च्या बातमीचा दणका! कोऱ्हाळेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई


‘बारामती संचार’च्या बातमीचा दणका! कोऱ्हाळेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई

कोऱ्हाळे : कोऱ्हाळे बुद्रुक येथील कठीणपुलजवळ, लाटे रोड परिसरात सुरू असलेल्या कथित जुगार अड्ड्याबाबत ‘बारामती संचार’ने ७ ऑक्टोबर रोजी वृत्त प्रसिद्ध करत पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल घेत वडगाव निंबाळकर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पत्त्यांच्या जुगारावर छापा टाकला.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत ‘१३ पानी’ नावाचा पत्त्यांचा जुगार खेळताना चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण १ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

७ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ८.१५ वाजता कोऱ्हाळे बुद्रुक येथील कठीणपुल ते लाटे रोडवरील फॉरेस्टलगतच्या मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली. यावेळी विशाल उदयसिंह साळवे, आकाश संजय साळवे, मयुर महेंद्र अहिवळे आणि राहुल सुधाकर यादव, सर्व रा. वडगाव निंबाळकर, हे जुगार खेळताना पोलिसांना आढळून आले.

Advertisemen

या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २१६/२०२६ नुसार मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांची तत्काळ कारवाई

कोऱ्हाळे बुद्रुक परिसरात जुगार सुरू असल्याबाबत नागरिकांमध्ये चर्चा होती. या पार्श्वभूमीवर ‘बारामती संचार’ने संबंधित ठिकाणी सुरू असल्याच्या कथित जुगार अड्ड्याबाबत वृत्त प्रसिद्ध करून पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केल्याने अवैध धंद्यांविरोधातील कारवाईबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पन्हाळे, खेडकर, चौधरी तसेच पोलीस शिपाई येटाळे आणि धोत्रे यांनी केली.

‘बारामती संचार’च्या वृत्तानंतर झालेल्या या कारवाईमुळे अवैध जुगाराविरोधात पोलिसांची भूमिका स्पष्ट झाली असून, परिसरातील इतर अवैध धंद्यांवरही कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »