महसूलच्या फिर्यादीला पोलिसांची कचरापेटी


बारामती: बारामती तालुक्यात गौण खनिज चोरीचे प्रमाण वाढले असून गौणखनिज माफीयांना पोलिसांचे अभय असल्याचे दिसून येत आहे. कटफळ येथील बेकायदा गौणखनिज उत्खननात महसूल विभागाच्या कटफळ मंडळाधिकारी व गाव कामगार तलाठी यांनी धाड टाकली असता सदर ठिकाणी पोकलेन उत्खनन करत असल्याचे निर्देशनास आले. सदर पोकलेनवर संबंधित गाव कामगार तलाठी यांनी सदर पोकलेन जप्त करून ताब्यात घेण्यात आला परंतु चालक पळून गेल्याने सदर पोकलेन मालकाने सदरचा पोकलेन पोलीस स्टेशनला आणून लावण्याचे लेखी कबूल केल्याने तो गुन्ह्याच्या ठिकाणी सोडण्यात आला होता. परंतु संबंधित पोकलेन तिथून चोरीला गेल्याची फिर्याद कटफळ गाव कामगार तलाठी यांनी दि.12 सप्टेंबर 2024 रोजी दरम्यान बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. सदरच्या फिर्यादीला चार महिने लोटून गेल्यानंतरही आजपर्यंत चौकशी अधिकाऱ्याना व तपास कर्मचारी अधिकाऱ्याना सदरचा पोकलेन आढळलेला नसून चौकशी अधिकारी व तपास अधिकारी या चोरीबद्दल कुठलीही माहिती देण्यास तयार नाहीत. एवढे मोठे अवजड वाहन जर पोलिसांना सापडत नसेल तर गंभीर गुन्ह्यातील चोरी गेलेल्या सोने, नाणे, हिरे, माणके अशा छोट्या वस्तू सापडणार कशा हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. शासनाच्या फिर्यादीवर जर पोलीस कारवाई करत नसतील तर त्याबद्दल हलगर्जीपणा व दुर्लक्ष करत असतील तर सर्वसामान्य तक्रारदारांच्या फिर्यादीवर पोलीस कसा तपास करत असतील याबद्दल जनसामान्यांच्यात प्रतिकूल चर्चा चालू आहे. त्यामुळे पोलिसांच्या प्रतिमा मलिन होत असून पोलिसांबद्दल जनसामान्यांमध्ये अविश्वासाचे वातावरण तयार होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »