बालहत्येस जबाबदार ड्रायव्हर, ठेकेदार, पीडब्ल्यूडी व बा.न.प. अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार?
बारामती: बारामती येथे दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी बारामती नगर परिषद हद्दीतील अर्बन ग्राम ते जळोची स्मशान भूमी रस्ता (देवकाते पाटील पार्क रस्ता ते अर्बन ग्राम रस्ता) त्रिमूर्ती नगर जळोची या रस्त्याचे मजबुतीकरणाचे काम बारामती नगरपरिषदेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले होते. हे काम श्री राहुल कुंडलिक काटे मुक्काम पोस्ट बेलवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांना मिळाले होते व त्याचा सब ठेका पुनीत कंट्रक्शन (बेदमुथा) यांना बेकायदेशीर दिले होते. या संबंधितची संपूर्ण माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने अर्थपूर्ण व्यवहाराने दुर्लक्षित केले. सार्वजनिक बांधकामाचे सर्व नियम व अटी धाब्यावर बसून पुनीत कंट्रक्शनने हे काम बेकायदेशीर रित्या चालू केले. कामाच्या ठिकाणी कसलेही सूचनाफलक लावले नाहीत. या हलगर्जीपणामुळे मयत कु.श्रेयस विकास दडस वय वर्षे-10 याचा भीषण अपघात झाला व त्या तो मयत झाला. याबाबतची फिर्याद बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल केली असून यामध्ये ज्याच्यामुळे हा अपघात झाला ते पुनीत कंट्रक्शन यांना आरोपी केले असूनही त्यांना अटक केली नसल्यामुळे त्याबद्दल पोलीस खात्यामध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर या कामाचा मूळ ठेकेदार श्री.राहुल कुंडलिक काटे यांना आरोपी केले नसल्याबद्दल जनसामान्यांमध्ये तीव्र भावना आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाकडे पूर्ण दुर्लक्ष करून ठेकेदार व सब ठेकेदार यांना अभय दिल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी सांगत आहेत. पुनीत कंट्रक्शन व राहुल काटे यांच्या पाठीमागे खूप मोठे राजकीय ताकत असल्याने आम्ही त्यांना काळ्या यादीत टाकू शकत नाही. किंवा त्यांच्याकडून कामही काढून घेऊ शकत नाही. अशी उद्विघ्न प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या बोलीवर आमच्यासमोर व्यक्त केली आहे.
बारामतीत यापूर्वीही ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे खड्ड्यात पडून एक जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जणांचे अपघातामध्ये गंभीर इजा झाल्या असल्याच्या घटना असतानाही बारामती नगर परिषद बारामतीत विकास कामांच्या ठेकेदारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून मृत्यूचा सापळा रचत आहे का काय हा प्रश्न बारामतीकर करत आहेत?
जळोची येथील रस्त्याच्या कामाप्रसंगी झालेल्या अपघातात निष्पाप बालकाच्या मृत्यूस ठेकेदार राहुल कुंडलिक काटे यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याने त्यांना काळ्या यादीत टाकून त्यासोबत झालेले विकासकामांचे सर्व करार रद्दबातल करण्यात यावेत अशी लेखी मागणी मा.रविंद्र (पप्पू) सोनवणे -युवक कार्याध्यक्ष पुणे जिल्हा RPI (आठवले) यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग,बारामती आणि बारामती नगर परिषद कडे केली आली आहे.तसेच सदर अपघातास जबाबदार म्हणून मूळ ठेकेदार राहुल कुंडलिक काटे यांच्यावर बालकाच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा दखल करण्यात यावा अशी देखील मागणी करणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.