चोरी घातपात की शह काट शह! बारामतीत पूर्वा कॉर्नर लगत निरा डावा कालव्यावरील पूल गायब अजब घटना?
बारामती – पूर्वा कॉर्नर लगत निरा डावा कालव्यावरील सुशोभीकरणाच्या कामात उभा केलेला लोखंडी पूल आज भग्न अवस्थेत दिसत आहे. या पुलाचे लोखंडी अवशेष कुशल चोराने शिताफिने चोरून नेले आहे. बारामतीच्या मध्यवर्ती ठिकाणी सेंटर पॉइंटला गणल्या गेलेल्या दाट लोकवस्तीत शुभ्र प्रकाशात चोरांनी धाडस करून हे कृत्य केल्याचे प्रथम दर्शनी दिसते. परंतु या चोरीला अनेक बाजू असल्याची चर्चा जाणकारांमध्ये आहे. बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये यासंबंधीची फिर्याद दिली असून गुन्हा दाखल आहे.
चोराने चोरी करताना सहज चोरून घेऊन जाता येतील असे पुलाचे अवशेष चोरले नाहीत तर अतिशय कौशल्य पूर्वक अवघड चोरी केलेली आहे. त्यामुळे या चोरीमध्ये वेगळाच वास येत आहे. ठेकेदारांच्या अंतर्गत स्पर्धेतून असे कृत्य केल्याची संभावना असल्याची चर्चा मलिदा खाऊ ठेकेदारांमध्ये आहे. तर या पुलाच्या संरक्षणाची जबाबदारी बारामती नगर परिषदेची की सार्वजनिक बांधकाम विभागाची हा वेगळाच वाद दोन खात्यामध्ये चालू झाला आहे.
काही काळापूर्वी निष्कृष्ट दर्जाचे विद्युत खांबाचे नट बोल्ट चोरीला गेले की काम निष्कृष्ट दर्जाचे आहे यावरून बारामतीत बरीच चर्चा वृत्तपत्र, राजकारणी व सर्वसामान्यांनी केली. यातूनच हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. सदरची फिर्याद सार्वजनिक बांधकाम विभागाचे ठेकेदार साहिल खत्री यांनी दिली असून यामध्ये सदरचे काम नगरपरिषदेला हस्तांतरित केले असल्याचे म्हणले आहे असे असेल तर बारामती नगर परिषदेने या विरोधात पोलिसात फिर्याद का दिली नाही? असा प्रश्न जनसामान्यांना पडलेला आहे तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे ठेकेदार साहिल खत्री यांनी एवढ्या तत्परतेने फिर्याद देण्याचे तात्पर्य काय?
बारामती मध्ये भंगारचे व्यवसाय करणाऱ्यांमध्ये परप्रांतीयांचा मोठा भरणा असून या परप्रांतीय भंगारवाल्यांचे आंतरराजीय व्यापार संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल स्थानिक भंगारवाल्यांचा मोठा रोष असून आर्थिक नफ्याच्या साठी या दोन भंगारवाल्यांमध्ये व्यावसायिक शीत युद्ध आहे. त्यांचाही हा परिणाम असू शकतो याबद्दल शंका निर्माण केले जात आहे. काम पूर्ण झाल्यानंतर सदर कामाची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदाराकडे काही वर्षांसाठी असते. असे असताना ठेकेदार आपली जबाबदारी झटकून काम वर्ग केल्याचा आरडाओरडा का करीत आहे?
बारामतीच्या मध्यस्थानी जर ही जबरी फिल्मी स्टाईल चोरी होत असेल तर बारामतीतील सर्वसामान्य लोक किती सुरक्षित आहेत. तसेच बारामतीकर किती जागृत आहेत. हा ही प्रश्न निर्माण होत आहे. ही चोरी चोरांनी धाडसाने तर केलीच आहे, पण तंत्रशुद्ध शास्त्रीय दृष्ट्या नियोजन करून केली आहे. ही चोरी करण्यास कोणी प्रवृत्त तर केले नाही ना? की सुपारी देऊन ही कृत्रिम चोरी करण्यास भाग तर पाडले नाही ना? अशा असंख्य प्रश्नांचे ढिग बारामतीकरांच्या मनामध्ये निर्माण होत आहेत.
एक मात्र निश्चित झाले आहे की बारामतीतील व्यावसायिक स्पर्धेतून असे गुन्हे घडल्यास की घडवल्यास आश्चर्य वाटू नये. प्रशासनातील विविध खात्यांचे एकमेकांशी असलेले आर्थिक हितसंबंध भक्कम दिसत आहेत. पण जबाबदारी समन्वयाचा अभाव या घटनेतून स्पष्ट होत आहे.
बारामतीकरांनो सावधान!
पोलची बारी झाली, आता पुलाची बारी आली?
सदरचा पूल निकामी झाला असून पावसाचे दिवस चालू आहेत, वारा कावदानाने किंवा साध्या हादऱ्यानेही सदरचा पूल कधीही कोसळू शकतो? त्यामुळे या पुलाचा वापर बारामतीकरांनी तात्काळ बंद करावा! अपघात टाळा..
दुर्दैवाने बारामती नगरपरिषद बारामती, सार्वजनिक बांधकाम विभाग बारामती किंवा ठेकेदार साहिल खत्री यांनी धोक्याचे सूचनाफलक या परिसरात अजूनही लावले नाहीत.