भीषण अपघात: बारामती येथे तिघांचा दुर्दैवी मृत्यू; हायवा चालकाविरोधात गुन्हा दाखल


बारामती : २७ जुलै २०२५ रोजी सकाळी ११:१५ ते ११:३० वाजण्याच्या सुमारास बारामती शहरातील महात्मा फुले चौक, खंडोबानगर येथे एका भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात ओंकार राजेंद्र आचार्य (वय ३७), त्यांची १० वर्षांची मुलगी सई ओंकार आचार्य आणि ४ वर्षांची मुलगी मधुरा ओंकार आचार्य यांचा समावेश आहे. याप्रकरणी टाटा कंपनीच्या हायवा चालकाविरोधात बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisemen

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार अमोल राजेंद्र आचार्य (वय ३३, रा. मॅजीक ग्रीनसिटी, खंडोबानगर, बारामती, सध्या रा. पिंपरी-चिंचवड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे भाऊ ओंकार आचार्य हे त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल (एम.एच. ४२ बी.के. ४८४४) वरून त्यांची दोन मुले सई आणि मधुरा यांच्यासोबत खंडोबानगरकडे घरी येत होते. महात्मा फुले चौकातून खंडोबानगरकडे जाणाऱ्या वळणावर दशरथ दत्तात्रय डोळे (वय ५०, रा. भिलारवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) हा टाटा हायवा (एम.एच. १६, सी.ए. ०२१२) भरधाव वेगाने, निष्काळजीपणे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालवत होता.
या हायवा चालकाने वळणावर मोटारसायकलला ओव्हरटेक करताना मागच्या चाकाने धडक दिली. या धडकेत ओंकार आचार्य, सई आचार्य आणि मधुरा आचार्य यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच मोटारसायकलचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या घटनेनंतर अमोल आचार्य यांनी तात्काळ बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन दशरथ दत्तात्रय डोळे या हायवा चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता आणि मोटर वाहन कायद्याच्या गु.र.नं: 263/2025
कलम: BNS 281, 106(1), 125(a), 125(b), 324(4) मो.वा.का.क 184 संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल सातपुते करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »