पहाटेच खेळ चाले!
बारामती– बारामती तालुक्यातील मौजे. सावळमध्ये गौण खनिज माफीयांचा सुळसुळाट झाला असून गाव कामगार तलाठी व मंडलाधिकारी निर्धास्त आहेत. शासनाचा करोडो रुपयाचा महसूल बुडवून गौणखनिज माफीया लक्षाधीश होत आहेत. गाव कामगार तलाठी, मंडल अधिकारी, तालुका दंडाधिकारी, विभागीय अधिकारी व जिल्हा दंडाधिकारी अब्जाधीश होत आहेत. या दृष्टचक्रामुळे सफेद गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून काळा पैसा निर्माण होत आहे. या काळ्या पैशाचा वापर गुन्हेगारी टोळ्या निर्माण करणे व बारामती तालुक्यात अशांतता निर्माण करून दहशत माजवणे याकरीता होत आहे. बारामती औद्योगिक क्षेत्राचा विकास होत असून बारामती नगरपरिषदेची हद्दही वाढली जात आहे. या हद्दीलगत सावळ गावामध्ये मुरूम उत्खननाचा पहाटेचा खेळ चालतो या गुलाबी थंडीत गाव कामगार तलाठी व मंडल अधिकारी उबदार पांघरुणात गुलाबी निद्रेचा आस्वाद घेत असतात. या निद्रा अवस्थेतच मुरूम दरोडेखोर मुरुमावर दरोडा टाकून साक्ष पुरावे गायब करत आहेत. याबाबत पुराव्यासहित तक्रार दिल्यानंतरही कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे या मुरूम दरोडेखोरांचे चोऱ्या करण्याचे मनोधैर्य वाढले असून यांची गावातील व परिसरातील दहशत वाढली आहे. त्यामुळे गौण खनिज चोरीचे प्रमाण ही वाढले आहे. बारामतीतील महसूल प्रशासनाकडून चोऱ्या मुद्दामहून हिस्स्याच्या अभिलाषे पायी पकडल्या जात नाही, शोधही घेतला नाही आणि ते थांबवलंही जात नाही. त्यामुळे “पहाटेचा खेळ चाले” आता दिवसा आणि रात्रीही चालू राहील. सर्वसामान्यांनी जागते रहो!