कर्मचाऱ्यांच्या अभावी बारामती पंचायत समिती ठप्प!
बारामती – बारामती मधील पंचायत समितीची इमारत दिमाखात उभी आहे. अतिशय सुसज्ज सुनियोजित बांधकाम केलेली ही इमारत बघता क्षणी बारामतीच्या वैभवाची व विकासाची झलक दाखवणारी आहे. इमारतीच्या आतील नवीन जडणघडण टेबल खुर्च्या अंतर्गत कार्यालय वातावरणानुकूलित कार्यालय लोकांना बसण्यासाठी विविध विभाग अशा विविध सुखसोयी साधनांनी अद्यावत असणारे हे बारामतीचे वैभव डोळ्याचे पार्ण फेडणारे आहे. पवार कुटुंबियांची दूरदृष्टी बारामती तालुक्याला सर्व सोयी युक्त कार्यालय देण्याची त्यांची भूमिका व त्यांनी केलेल्या प्रयत्नांना आलेले यश सर्व महाराष्ट्राने हेवा करावा असा आहे.
पण आत मधील निम्म्यापेक्षा जास्त कर्मचारी खुर्च्या कर्मचाऱ्यांविना मोकळ्या आहेत. एक एक अधिकाऱ्यावर तीन-तीन विभागाची जबाबदारी असून असे अधिकारी एकही विभागाला न्याय देत नसल्याचे दिसून येत आहे. एका ग्रामसेवकाकडे दोन तीन गावांचा कारभार आहे. गट अधिकारी विस्तार अधिकारी यांच्याकडे कितीतरी विभागाची जबाबदारी टाकली जात आहे. “एक ना धड भाराभर चिंध्या” अशी अवस्था बारामती पंचायत समितीची झाली आहे. कर्मचाऱ्यांविना कार्यालय असल्यामुळे जनसामान्यांना इमारतीमधील मोकळ्या खुर्च्यांना धडका देऊन परत खर्चासहित गावी जावे लागत आहे. अनेक सरपंच कार्यालयाकडे हेलपाटे घालून थकले आहेत. असे असतानाही रिक्त पदांवरती कर्मचारी भरण्याचे काम जिल्हा परिषद करत नाही. अनेक विकास योजना या कागदावर असून त्या कागदावरच राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विकास निधी खर्च पडला नसल्याने पुणे जिल्हा परिषदे कडून कोट्यावधी रुपये सरकारला परत पाठवण्यात आले आहे.
मा. अजित दादा पवार अर्थमंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी बारामती विधानसभा कार्यक्षेत्रात अत्यंत परिश्रमाने कष्टाने अनेकांच्या विरोधाला सामोरे जाऊन हा निधी बारामतीसाठी आणला आहे. परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अखर्चिक निधी परत जात असून कर्मचाऱ्यांच्या इच्छाशक्ती अभावी बारामतीकर विकासापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे बारामती पंचायत समितीमध्ये विशिष्ट दलाल, पुढार्यांची गर्दी वाढली असून नफ्याची कामे करण्यासाठी पंचायत समिती ओसांडून वाहत आहे. तर सर्वसामान्य मतदारांनी पंचायत समितीकडे पाठ फिरवली आहे. हे चित्र बदलण्याची वाट पाहत मा. शरदचंद्रजी पवार साहेब संसदरत्न सौ. सुप्रियाताई सुळे खासदार बारामती लोकसभा मतदारसंघ यांच्या आशीर्वादाची व अजितदादा पवारांच्या आदेशाची बारामतीकर चातकाप्रमाणे डोळे लावून वाट पाहत आहे.