सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे बालकाचा मृत्यू!
बारामती : बारामती नगर परिषद हद्दीतील त्रिमूर्तीनगर जळोची, बारामती येथे रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम चालू असताना दि. 23.11.2024 शनिवार रोजी घडलेल्या अपघातात एका बालकाचा जीव गेला. सदर अपघातास जबाबदार असणारे मुख्य ठेकेदार, सब ठेकेदार आणि सदर रस्त्याच्या कामाची पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कामात अक्षम्य कसूराई केल्यामुळे एका निष्पाप बालकाचा जीव गेला आहे. सदरच्या कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोणत्याही नियम व अटींचे पालन करण्यात आले नाही त्यामुळे सदरचा अपघात झाला असून हा अपघात नसून निष्काळजीपणाचा परिणाम आहे.त्यामुळे वरील कामाशी संबंधित मुख्य ठेकेदार, सब ठेकेदार व कामाची पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर बालकाच्या मृत्यूस जबाबदार असल्याचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा आणि सदर कामाची पाहणी करणारे अधिकारी यांचे तत्काळ निलंबन करून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत त्यांची चौकशी करून सदर दोषी अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात यावी. तसेच वर नमूद रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी योग्य ती सुरक्षेची काळजी न घेतल्याने आणि नियमांचे उल्लंघन केल्यामुळे घडलेल्या अपघातास जबाबदार मुख्य ठेकेदार , सब ठेकेदार यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत देण्यात आलेली सर्व कामे तत्काळ काढून घेण्यात यावी आणि त्यांना यापुढील काळात सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे देण्याबाबतचे मनाई आदेश देऊन काळ्या यादीत टाकण्यात यावे. संबंधित ठेकेदारांना कामातील अशा निष्काळजीपणामुळे महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचे शासकीय तथा निमशासकीय काम करण्यास मज्जाव करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनास करण्यात यावी. यापुढील काळात अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडूच नयेत याकरीता संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना करण्यात याव्यात. अशा प्रकारचे लेखी निवेदन मा.सुभाष पाटील (सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग,बारामती) यांना देण्यात आले. सदर दुर्दैवी घटनेस जबाबदार ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई न केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षमार्फत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा रविंद्र (पप्पू) सोनवणे (युवक कार्याध्यक्ष पुणे जिल्हा RPI आठवले ) यांच्याकडून देण्यात आला आहे.