इंस्टाग्रामवर धारधार कोयता बाळगुन स्टेटस ठेवणारे ताब्यात, तपासादरम्यान बंदुक सापडली; आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांची कार्यवाही
बारामती : सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहीता सुरु असुन पोलीस विभागाकडून समाज माध्यमांवर करडी नजर ठेवली जात आहे. त्यातच इंस्टाग्रामवर धारदार कोयता बाळगून स्टेटस ठेवणाऱ्यावर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बारामती तालुका पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चालू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी इंस्टाग्राम, व्हाट्सअप, फेसबुक व अन्य समाज माध्यमांवर पोलीस विभागाकडुन करडी नजर ठेवली जात आहे.
निवडणुक आचारसंहिता काळात बारामती शहर व तालुक्यातील सोशल मीडिया अकाउंट वर लक्ष ठेवून त्यांचे मॉनिटरिंग करणेबाबत माननीय पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण यांच्याकडून सूचना करण्यात आल्या होत्या. सदर सूचनांचे अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांना सावळ येथील आरोपी आकाश शेंडे हा धारदार कोयता बाळगून त्याचे इंस्टाग्राम अकाउंटला स्टेटस ठेवत असल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती. सदर माहितीच्या अनुषंगाने आज रोजी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून स्टेटसला ठेवण्यात आलेला धारदार कोयता जप्त करण्यात आला. त्यानंतर सदर आरोपीच्या मोबाईल ची बारकाईने पाहणी केली असता त्याच्या मोबाईल मध्ये बंदुक बाळगल्याचे फोटो मिळून आले. त्याबाबत त्याच्याकडे तपास करता त्याने सदरचे बंदुक हे त्याचा साथीदार रोहित वनवे राहणार लाकडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्याकडे असल्याचे सांगितल्याने रोहित वनवे यास पोलीस पथकाने ताब्यात घेऊन त्याची पंचा समक्ष अंग झडती घेतली असता त्याचे ताब्यात एक सिल्वर रंगाचे बंदुक व एक खाली पुंगळी मिळून आली. सदर आरोपीकडे बंदुकबाबत विचारपूस करता त्याने सदरचे बंदुक हे सागर भिंगारदिवे रा तांदुळवाडी यांच्याकडून सुमारे दोन महिन्यापूर्वी विकत घेतल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस पथकाने भिंगारदिवे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे पीस्टल बाबत तपास करता ओंकार महाडीक याचेकडून प्राप्त केल्याचे सांगितले.
सदर कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपी नामे आकाश शेंडे ,रोहित वनवे व सागर भिंगारदिवे यांना अटक केली आहे. ही कारवाई श्री पंकज देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, श्री संजय जाधव अप्पर पोलीस अधीक्षक बारामती, श्री सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक राहुल घुगे, पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी ,पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लेंडवे पो. हवा. राम कानगुडे, अतुल पाटसकर, बापू बनकर, पो. ना. अमोल नरुटे, पो.शि.तुषार लोंढे यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी हे करीत आहेत.
युवकांनो सावधान… पोलिसांची नजर आहे..
युवकांनो सावधान रहा… पोलिसांची समाज माध्यमावर नजर आहे. सध्या आचारसंहिता व निवडणुकीचा काळ आहे. कायद्यानुसार घालून दिलेल्या चौकटीत राहून आदर्श आचारसंहितेचे पालन सर्वांनी करायचा आहे. आचारसंहितेचा भंग होईल असे कुठलेच कृत्य युवकांनी करू नये. वेळ आढळल्यास कारवाई निश्चितपणे होणार आहे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आदर्श आचारसंहिता पालन निमित्त केलेल्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी व बारामती तालुका पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.