शिरसुफळमध्ये विनापरवाना फटाक्यांचा साठा; पोलिसांची कारवाई


शिरसुफळमध्ये विनापरवाना फटाक्यांचा साठा; पोलिसांची कारवाई

बारामती | प्रतिनिधी

शिरसुफळ (ता. बारामती) येथे विनापरवाना आणि धोकादायक पद्धतीने फटाक्यांचा साठा केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई ११ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आली.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, शिरसुफळ येथील ‘बालाजी फटाका मार्ट व कृषी सेवा केंद्र’ येथे फटाक्यांचा बेकायदेशीर साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता फटाक्यांचे मोठ्या प्रमाणात बॉक्स आढळून आले.

पोलिसांनी फटाक्यांची विक्री व साठवणुकीचा परवाना तसेच संबंधित कागदपत्रांची चौकशी केली. संबंधित व्यक्तीने हा फटाका साठा २०२५ मध्ये दिवाळीच्या काळात विक्रीसाठी खरेदी केल्याचे आणि काही माल शिल्लक राहिल्याचे सांगितले. मात्र, त्याच्याकडे असलेला तात्पुरता फटाका विक्रीचा परवाना केवळ १५ दिवसांसाठी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

Advertisemen

कारवाईदरम्यान KURUVI CRACKERS, SHRIMARUTHAM CRACKERS, Nature Varsha, LION DELUXE, KARPAGAM BIG GROUND CHAKKAR आणि KARPAGAM FLOWER POTS SPECIAL या प्रकारच्या फटाक्यांचा साठा आढळून आला. FIR मधील मालमत्ता तपशीलानुसार जप्त मालाची किंमत ₹४७,१०० नमूद करण्यात आली आहे.

पोलिसांच्या तक्रारीनुसार, हा फटाका साठा विनापरवाना तसेच मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा परिस्थितीत ठेवण्यात आला होता. घटनास्थळी अग्निशमन यंत्रणा नसल्याचाही उल्लेख FIR मध्ये करण्यात आला आहे.

या प्रकरणी Explosives Act, 1884 मधील कलम 9(B)(1)(b) अन्वये बारामती तालुका पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0377/2026 दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार राहुल गौतम मखरे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »