बारामतीत गुटख्याची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई; १ लाख २ हजारांचा मुद्देमाल जप्त
बारामतीत गुटख्याची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई; १ लाख २ हजारांचा मुद्देमाल जप्त
बारामती : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू विक्रीसाठी घेऊन जात असल्याच्या आरोपावरून बारामती पोलिसांनी एका व्यक्तीवर कारवाई केली. या कारवाईत गुटखा व तंबाखूसह इलेक्ट्रिक स्कूटर असा एकूण १ लाख २ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती ॲग्रो साखर कारखान्याजवळील इंगळेवस्ती परिसरात प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी आणला जाणार असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने पंचांसह परिसरात पाळत ठेवली.
दरम्यान, १६ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११.५० वाजता एका व्यक्तीला इलेक्ट्रिक स्कूटरवर पोते घेऊन येताना पोलिसांनी पकडले. चौकशीत त्याने आपले नाव सागर मधुकर साळुंखे (वय ३३, रा. मदनवाडी, भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे) असे सांगितले.
त्याच्या ताब्यातील पोत्याची तपासणी केली असता विमल पानमसाला, तंबाखू व इतर प्रतिबंधित पदार्थ आढळून आले. यामध्ये ₹१९,९९८ किमतीचे १०१ पुडे विमल पानमसाला, ₹२,४०७ किमतीचे ९९ पुडे V1 तंबाखू, ₹३३६ किमतीचे ३१ पुडे तंबाखू आणि ₹१,३९५ किमतीचे ३१ पुडे असा माल मिळून आला. याशिवाय ₹७५ हजारांची चेतक बजाज इलेक्ट्रिक स्कूटर (MH 42 BM 1436) जप्त करण्यात आली.
या प्रकरणी बारामती पोलिस ठाण्यात FIR क्रमांक 0388/2026 नोंद करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील विविध कलमांसह भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २२३, २७२ आणि २७३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रतिबंधित पदार्थांचा पुरवठादार, वाहतूकदार आणि उत्पादक कोण आहेत, याचा तपास करण्याची मागणी FIR मध्ये करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण विनायकराव पवार यांच्या नोंदीनुसार सुरू आहे.


