बारामती नगर परिषद प्रशासन चालवतंय तरी कोण?
बारामती- (बारामती संचार वृत्तपत्र) बारामती नगरपरिषद मध्ये नेमकं चाललंय काय? हा प्रश्न बारामतीकरांना पडावा अशी सातत्याने बारामती नगरपरिषद मध्ये विविध घटना घडत आहेत. या अनुषंगाने बारामती संचारने “बेलगाम बारामती नगरपरिषद” या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. पण गेंड्याची कातडी पांघरून टेबला खालचं उष्ट खाणारी प्रवृत्तीला जाग येत नाही. बारामती नगरपरिषदेला प्रशासकीय इतिहासात ज्या घटना कधीच घडल्या नाहीत अशा घटना बारामती नगरपरिषद मध्ये घडत आहेत. कोणाचा पायपुस कोणाला नाही. सैरभैर झालेले कर्मचारी अधिकारी आणि यांच्यावर बेलगाम अधिकार गाजवणारे मुख्याधिकारी यांच्या विसंवादामुळे बारामतीचे आर्थिक शोषण करणारी ठेकेदारांची दरोडेखोर टोळी नगरपरिषद चालवत असल्याचे जनसामान्यांच्या निदर्शनास येत आहे.

बारामती नगरपरिषदेने उद्यान विभागाच्या मार्फत फक्त भिगवन रोड वरील झाडांना रंग देण्याची निविदा प्रसिद्ध केली. प्रसिद्धी दिनांक 10 ऑक्टोबर 2025 होती व निविदा भरण्याची अंतिम तारीख 27 ऑक्टोबर 2025 ही असताना बारामती नगर परिषदेने विना ठेका मंजूर करता मनमानी पद्धतीने बेकायदेशीर हे काम तात्काळ पूर्ण करून घेतले. ही बातमी प्रसिद्ध होण्यापूर्वी कदाचित याची देय (बिल) देऊनही टाकले असतील कुठल्याही कायदेशीर प्रक्रिये शिवाय बेकायदेशीर कामे कशी करून घ्यावी हे बारामतीच्या प्रशासकीय इतिहासात प्रथमच घडले असेल. कोणाचे आर्थिक हितसंबंध जोपासायचे आहेत. याबाबत विभाग प्रमुख गौरव द्रुगकर यांना काहीही माहीत नसल्याचे उद्यान विभाग प्रमुख सांगतात तर मुख्याधिकारी चौकशी करून बोलू असे म्हणतात. म्हणजेच काय काम कोणाचे आहे, कोणाला दिले आहे, कशासाठी दिले आहे याबाबत विभाग प्रमुख व मुख्याधिकारी यांना काहीही माहिती नाही. म्हणजेच काय बारामती नगर परिषद प्रशासन कोण चालवत आहे? कोण मलिदा खात आहे? कोण देत आहे?

बारामती नगरपरिषद हद्दीत वृक्ष गणना केली जात नाही. बेकायदेशीर वृक्षतोड थांबवली जात नाही. दिलेल्या तक्रारीवर कार्यवाही केली जात नाही. म्हणजे जागतिक दर्जाचे कौशल्य असलेले मुख्याधिकारी बारामतीला मिळाले. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामतीला बारामतीकरांच्या सेवेसाठी त्यांना बारामतीकरांना जे दिले हे बारामतीकरांचे सुदैव की दुर्दैव हे उद्याच्या नगरपरिषद निवडणुकीत बारामतीकर ठरवतील.

