सोशल मीडियावर ‘ठोकतो, तोडतो’ धमकी देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल; बारामती पोलिसांची कठोर कारवाई


बारामती, दि. २०: सोशल मीडियावर ‘आम्ही ठोकत नाही ओ, मी तोडतो, माझा पॅटर्नच वेगळा आहे’ अशा धमकीवजा आणि दहशत निर्माण करणाऱ्या आशयाचा व्हिडिओ ‘सरकार नो कॉम्प्रोमाइज’ असे कॅप्शन टाकून पोस्ट करणाऱ्या एका तरुणावर बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. समाजात दहशत व भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
श्रीकांत अर्जन घुले (वय २५, रा. ढेकळवाडी, ता. बारामती) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने १८ ऑक्टोबर रोजी त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवर वंजारवाडी येथील एका जीवे मारण्याच्या प्रकरणासंदर्भात हा व्हिडिओ पोस्ट केला होता.
या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील आणि पोलीस जवान राजू बन्ने यांनी खातरजमा केली. पोलीस जवान बन्ने यांच्या तक्रारीवरून श्रीकांत घुले याच्याविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ३५३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहशत व दादागिरी करणाऱ्यांची तक्रार करण्याचे आवाहन
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी स्पष्ट केले आहे की, बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोणत्याही गावात, एमआयडीसी किंवा सूर्यनगरी परिसरात कोणीही दादागिरी किंवा दहशत निर्माण करत असेल, तर नागरिकांनी ९९२३६३०६५२ या क्रमांकावर तात्काळ कळवावे. अशा व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पो. हवा. किशोर वीर हे करत आहेत. सोशल मीडियावर दादागिरी करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याबद्दल बारामती तालुका पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »