बारामती MIDC परिसरात तलवार आणि लोखंडी कोयत्यासह एक जेरबंद; बारामती तालुका पोलिसांची धडक कारवाई


बारामती दि. २३ – बारामती एमआयडीसी (MIDC) परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे तलवार आणि लोखंडी कोयता बाळगणाऱ्या एका आरोपीला बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे. समर्थ सिद्ध मल्हारे (रा. मालुसरेवस्ती, वंजारवाडी, ता. बारामती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय न्याय संहिता कलम १९४(२) अंतर्गत दुसऱ्या एका गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना बारामती तालुका पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, समर्थ मल्हारे हा इसम तलवार बाळगून आहे. याची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ सूत्रे हलवली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एमआयडीसी परिसरातील श्रायबर डायनामिक्स डेअरीच्या शेजारच्या परिसरात छापा टाकला.
या छाप्यात पोलिसांनी मल्हारे याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने तलवार घरी ठेवल्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता, एक तलवार आणि एक लोखंडी कोयता मिळून आला.
याप्रकरणी आरोपी समर्थ सिद्ध मल्हारे याच्याविरुद्ध बारामती तालुका पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार, उपनिरीक्षक कल्याण शिंगाडे, अंमलदार केदारनाथ बिडवे, दादा दराडे, किशोर वीर, निलेश वाकळे, विलास खाडे, रवींद्र सोनवलकर आणि राहुल लांडगे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »