इंदापूरमध्ये ६ टन प्रतिबंधित आफ्रिकन मागूर मासे जप्त; ₹१९.२० लाखांचा मुद्देमाल, दोघांविरुद्ध गुन्हा
इंदापूरमध्ये ६ टन प्रतिबंधित आफ्रिकन मागूर मासे जप्त; ₹१९.२० लाखांचा मुद्देमाल, दोघांविरुद्ध गुन्हा
इंदापूर, दि. ३० : इंदापूर तालुक्यातील शहा गाव परिसरात प्रतिबंधित आफ्रिकन मागूर (Clarias gariepinus) माशांची बेकायदेशीर वाहतूक उघडकीस आली असून, पोलिसांनी सुमारे ६ टन मासे आणि आयशर टेम्पोसह एकूण ₹१९.२० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध विविध कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एफआयआरनुसार, २५ जुलै २०२६ रोजी रात्री शहा गावातील इजगुडे वस्ती परिसरात पोलिसांनी MH-42 BU-9559 क्रमांकाचा आयशर टेम्पो अडवला. मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर वाहनात असलेले मासे हे प्रतिबंधित आफ्रिकन मागूर जातीचे असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. वाहनात अंदाजे ६ टन मासे आढळून आले.
या प्रकरणात मनोजकुमार पिरमालू गुरुदास याच्यावर प्रतिबंधित माशांचे संवर्धन केल्याचा, तर रोहिदास रामचंद्र मंजुळकर याच्यावर त्यांची वाहतूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
तक्रारदार असलेले सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी राजेंद्र रूपचंद राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रतिबंधित माशांचे पालन व वाहतूक करून पर्यावरणाला धोका निर्माण करण्यात आला असून, शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, अन्न सुरक्षा व मानके अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त केलेले सर्व मासे पंचनामा करून इंदापूर नगरपालिका कचरा डेपो येथे खड्डा खोदून पोलिस व पंचांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आले. आयशर टेम्पो पुढील तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संतोष सुरेश शिंदे करीत आहेत.


