लोणी भापकर येथे तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह गंभीर गुन्हा दाखल
लोणी भापकर येथे तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह गंभीर गुन्हा दाखल
बारामती, दि. ३० : बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथे जुन्या वादातून एका २४ वर्षीय तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध शस्त्र अधिनियम, अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रथमेश उर्फ सोन्या जालिंदर कांबळे (वय २४, रा. लोणी भापकर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी अभिषेक तात्या पवार, प्रथमेश जालिंदर खोमणे, महेश गणपत भापकर आणि ओंकार उर्फ सोनू राजेश आरडे यांनी पूर्वीच्या वादाचा राग मनात धरून संगनमताने हल्ला केला.
तक्रारीनुसार, आरोपींनी फिर्यादीला एका पोल्ट्री फार्मवर बोलावून घेतले. तेथे त्याच्यावर कोयत्याने चेहरा, मान आणि हातावर वार करण्यात आले. जीव वाचवण्यासाठी तो घटनास्थळावरून पळून गेला. गंभीर जखमी झालेल्या फिर्यादीला उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी शस्त्र अधिनियम, अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षकांकडे सोपविण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करत असून आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे.


