बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतील गुंड एक वर्षासाठी एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत स्थानबद्ध, अमरावती कारागृहात रवानगी


बारामती: पुणे ग्रामीण जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणारे, सामान्य लोकांना धमकावून गुन्हे करणारे, अंमली पदार्थ विकणारे, अवैध वाळू व्यवसाय करणारे, अवैध दारू विक्री करणारे आणि धोकादायक व्यक्तींविरुद्ध पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आणि जनतेतील दहशत कमी करण्यासाठी एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.
बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतील सुहासनगर आमराई येथे राहणारा हर्षद राजू काकडे उर्फ बागवान, वय २८ वर्षे, याच्यावर जबरी चोरी, भांडण, आणि खंडणी मागण्याचे गुन्हे दाखल होते. त्याच्या दहशतीमुळे बारामती शहर आणि परिसरातील नागरिक त्रस्त होते. त्यामुळे, पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी त्याच्यावर एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना प्रस्ताव सादर केला.

Advertisemen

पंकज देशमुख यांनी प्रस्तावाचे अवलोकन करून तो जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी पुणे यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हर्षद राजू काकडे उर्फ बागवान याला सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा आणण्यापासून रोखण्यासाठी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्यकलाकृतीची विना परवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती (व्हिडीओ पायरेटस) वाळू तस्कर व जिवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंधक करण्याविषयीचा कायदा सन १९८१ (सुधारणा २०१५) अन्वये १ वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. या आदेशानुसार, पोलिसांनी हर्षद राजू काकडे याला ३० एप्रिल २०२५ रोजी ताब्यात घेऊन अमरावती मध्यवर्ती कारागृहात जमा केले. त्याच्यावर १ वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी सांगितले की, याप्रमाणेच गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि अवैध धंदे करणाऱ्या इसमांवर देखील जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक विलास नाळे, पोलीस उपनिरीक्षक सतीश राऊत आणि पोलीस अंमलदार महेश बनकर, सागर जामदार, अभिजित कांबळे, अमीर शेख, सुलतान डांगे, रामचंद्र शिंदे, अक्षय सिताप, जितेंद्र शिंदे, दत्तात्रय मदने, अमोल देवकाते यांच्या पथकाने पार पाडली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »