बारामतीत जाणवतोय इलेक्शन फिव्हर , हा राजकीय डावपेच नाही तर नणंद विरुध्द भावजय ही लढाई अटळ असल्याची चर्चा
बारामती – लोकसभा निवडणूकीचा बिगुल वाजल्यानंतर बारामतीत आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही बाजूंकडून परस्परांवर आरोप प्रत्यारोप सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे.
उपमुख्यंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय समस्त पवार कुटुंबियांना पसंत पडला नाही आणि अजित पवार विरुध्द पवार कुटुंबिय असे आजचे चित्र आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरविण्याचा निर्णय झाला तेव्हा पासून ख-या अर्थाने पवार कुटुंबातील या संघर्षाला धार आली.
निवडणूकीचा बिगुल वाजल्यानंतर आता पवार कुटुंबातील राजेंद्र पवार, सुनंदा पवार, श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, युगेंद्र पवार यांनी जाहीरपणे प्रचारात सहभागी होत सुप्रिया सुळे यांच्यासाठी भूमिका घेतली आहे. अजित पवार यांची भूमिका चुकली असे अगदी स्पष्टपणे सर्वांनी जाहीर सभातून सांगितले.
पवार कुटुंबातील संघर्ष हा राजकीय डावपेचांचा भाग असावा अशी कल्पना केलेल्या लाखो कार्यकर्त्यांनाही आता कुटुंबात उभी फूट पडल्याचे मान्य करत एका बाजूला जाण्याचे ठरवावे लागले आहे. केवळ बारामतीच नाही तर राज्यातील कट्टर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अजूनही हे गणित पचनी पडत नसले तरी वस्तुस्थिती आता नणंद विरुध्द भावजय ही लढाई अटळ असल्याची आहे.
अजित पवार यांच्यावर टीका करताना भाजपचे हे षढयंत्र असल्याचे आवर्जून सर्वांनीच सांगितले, सुप्रिया सुळे यांनीही वेळोवेळी ही वैयक्तिक लढाई नसून वैचारिक व अदृश्य शक्तीशी लढाई असल्याचे सांगितले आहे. अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी काटेवाडीत बोलताना अगदी स्पष्टपणे अजित पवार यांची भूमिका मान्य नसून पवारसाहेबांसाठी काम करणार असल्याचे सांगत वैचारिक भूमिका वेगळी असल्याचे स्पष्ट केले.
पवार कुटुंबातील लढाई ही त्या कुटुंबापुरती मर्यादीत नसून राज्यातील दोन कुटुंबाला मानणा-या कार्यकर्त्यांमधील लढाई झाली आहे. एका बाजूची सोशल मिडीयावर पोस्ट पडली की त्याला दुस-या बाजूने लगेचच प्रत्युत्तर दिले जात आहे. अजित पवार यांनी आपल्या मागे असलेल्या कार्यकर्त्यांवर ही निवडणूक सोपविली असून जिवाभावाचे कार्यकर्तेच माझ कुटुंब असा संदेश देत त्यांनी कामाला प्रारंभ केला आहे.
पुणे विभागातील चार मतदारसंघापैकी बारामतीची निवडणूक सर्वात अगोदर म्हणजे 7 मे रोजी होणार आहे. तरिही प्रचारासाठी असलेला पुरेसा कालावधी विचारात घेता, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही बाजूंनी व्यूहरचना सुरु झाली आहे.
वैयक्तिक गाठीभेटी, गावभेटी, छोट्या सभा, बूथ कमिटी कार्यकर्त्यांच्या बैठकांना वेग आला असून बारामतीत इलेक्शन फिव्हर जाणवू लागला आहे.

