महाराष्ट्रात भाजप आहे कुठे?


ज्यांच्याविरुद्ध घरोघरी प्रचार केला, ज्यांच्यावर भ्रष्टाचार वा अन्य प्रकारचे गंभीर आरोप केले, त्याच नेत्यांना आता आपले मानून त्यांचा प्रचार करण्याची वेळ यंदा भाजपच्या कार्यकर्त्यांवर आली आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत भाजपचा मूळ चेहरा दिसूच नये, याची काळजी सत्तावंतांनी घेतलेली दिसते

२०२४ हे निवडणुकीचे वर्ष आहे. सत्ता मिळवण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेपोटी आंधळा झालेला भारतीय जनता पक्ष हा स्वतःचाच कार्यकर्ता मारून पक्ष श्या घालवतो की काय अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे. २०१४ साली मोदीजींच्या रूपाने देशात भाजपची एकहाती सत्ता आली आणि त्या लाटेच्या जोरावर गेली अनेक दशके मेहनत करणारा मूळ भाजपचा सामान्य कार्यकर्ता आता आमदार अथवा खासदार होईल असे वाटले. पण गेल्या दहा वर्षात इतर राजकीय पक्षात फोडाफोडीचे राजकारण करून मूळ शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस या पक्षांतून पळवलेल्या नेत्यांना आज भाजपने स्वतःचे चेहरे बनवले आहे. ज्या विरोधी पक्षातील नेत्यांशी संघर्ष केला, प्रसंगी हाणामाऱ्या केल्या, ज्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आज त्याच नेत्यांना भाजप कार्यकर्त्यांना डोक्यावर घेऊन नाचावे लागत आहे.

उत्तर महाराष्ट्रापासून सुरुवात केली तर नंदुरबारमधील आत्ताचे भाजप नेते विजयकुमार गावित आणि त्यांची कन्या हिना गावित, हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे. धुळे येथील अमरीश पटेल आणि त्यांचे समर्थक काँग्रेसचे. जळगावातील गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, चंद्रकांत पाटील आणि किशोर पाटील मुळात शिवसेनेचे. नगरमधील विखे-पाटील कुटुंबीयांचा प्रवास हा शिवसेना – काँग्रेस आणि आता भाजप असा राहिलेला आहे. नाशिकमध्ये भाजपनेच भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या व तुरुंगात टाकलेल्या छगन भुजबळ यांचा प्रचार भाजप कार्यकर्त्यांना करावा लागेल, बाकी भारती पवार (राष्ट्रवादी) व दादा भुसे, सुहास कांदे, हेमंत गोडसे, माणिकराव कोकाटे हे मूळ शिवसेनेचे नेते आहेतच. पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती काही वेगळी नाही. एकेकाळी पुणे जिल्ह्यातून पवार कुटुंबाला आणि घड्याळ चिन्हाला हद्दपार करू अशा घोषणा देणाऱ्या मूळ भाजप कार्यकर्त्यांना आज याच चिन्हाचा आणि पवार कुटुंबीयांचाही प्रचार करावा लागणार आहे. साताऱ्यात उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, रामराजे निंबाळकर, शंभुराजे देसाई यांचा अलीकडच्या काळापर्यंत भाजपशी काहीही संबंध नव्हता पण आज तेच त्यांचे नेते आहेत. सांगली येथील भाजप खासदार संजय काका पाटील हे मूळ राष्ट्रवादीचे तसेच कोल्हापुरात महाडिक, मंडलिक, माने आणि मुश्रीफ हे कोणीही मूळ भाजपवासी नसून आज भाजप कार्यकर्त्यांना त्यांचेच बॅनर झेंडे लावावे लागणार आहेत. सोलापुरात मूळ राष्ट्रवादीच्या रणजीत नाईक निंबाळकर यांच्या सेवेसाठी भाजप नेत्यांची फौज उभारण्यात आली आहे.
कोकणाचे सांगायचे झाले तर ठाण्यातील भाजपचे चेहरे एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, रवी फाटक हे मूळ शिवसेनेचे तर भाजपचे शहर अध्यक्ष निरंजन डावखरे हे मूळ राष्ट्रवादीचे आहेत. भिवंडीतील भाजप खासदार कपिल पाटील आणि किशन कथोरे यांची पार्श्वभूमीदेखील राष्ट्रवादीची. कल्याणमध्ये ज्या श्रीकांत शिंदेंच्या त्रासाला कंटाळून एकनिष्ठ भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला आज त्याच श्रीकांत शिंदे यांचा प्रचार भाजप कार्यकर्त्यांना करावा लागेल असे दिसते. नवी मुंबईतील नाईक कुटुंबीय व आमदार मंदा म्हात्रे हेदेखील शिवसेना- राष्ट्रवादी असा प्रवास करून आज भाजपचे नेते बनले आहेत. पालघर येथील राजकुमार गावित हे मूळ काँग्रेस- मग शिवसेना. रायगड जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना प्रशांत ठाकूर (मूळ काँग्रेस), गोगावले, थोरवे, दळवी (शिवसेना) आणि सुनील तटकरे (राष्ट्रवादी) यांचा प्रचार करावा लागणार आहे. खेडमध्ये ज्या रामदास कदम (शिवसेना) यांनी असंख्य वेळा भाजपच्या नेत्यांना शिव्यांची लाखोली वाहिली त्यांचा प्रचार करण्याचे मनोधैर्य भाजप नेते कुठून आणणार ? रत्नागिरीतील उदय सामंत आणि सिंधुदुर्गातील दीपक केसरकर दोघे (राष्ट्रवादी – शिवसेना) यांचा जयघोष करण्यासाठी भाजप नेत्यांना मानसिक सामर्थ्याची गरज आहे. राणे कुटुंबीयांनी तर थेट नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या पातळीची टीका अनेक वेळा केली असून रा. स्व. संघाला भर व्यासपीठावरून हाफ चड्डीवाले असे संबोधले आहे आणि आज तेच राणे कुटुंबीय हे महाराष्ट्र भाजपचा चेहरा आहेत ! मुंबईत चार पक्ष फिरून आलेले राहल नार्वेकर, हे भाजपचा खासदारकीचा चेहरा असतील तर मूळ भाजपच्या कार्यकत्यांना बाहेरून आलेल्या राहुल शेवाळे, यशवंत जाधव, सदा सरवणकर, कालिदास कोळंबकर, राम कदम, झिशान सिद्दीकी अशा असंख्य इम्पोर्टेड नेत्यांचा फौजफाटा सांभाळावा लागतो आहे.

Advertisemen

मराठवाडा आणि विदर्भ प‌ट्ट्यातील चित्रदेखील हे असेच आहे. वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे अब्दुल सत्तार, अतुल सावे, संजय शिरसाट आणि संदीपान भुमरे (सर्व मूळ शिवसेना) यांच्या प्रचारासाठीही भाजप कार्यकर्ते स्वतःच्या मनाची तयारी करत आहेत. धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये भाजप कशी संपेल, याची कधीकाळी रणनीती आखली होती. या भागात भाजपचे कट्टर वैरी म्हणून धनंजय मुंडे यांचे नाव घेतले जायचे. आताचे चित्र काही औरच आहे. हिंगोलीत हेमंत पाटील आणि संतोष बांगर (मूळ शिवसेना) यांना डोक्यावर घेऊन भाजप कार्यकर्त्यांना नाचावे लागणार आहे. लातूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवारांसाठी तर नांदेडमध्ये भाजपत नुकताच प्रवेश झालेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रचारासाठी सर्वतोपरी तयारी केवळ भाजप कार्यकर्त्यांच्या माथ्यावर आहे. धाराशिव येथे राणा जगजीत सिंग (मूळचे राष्ट्रवादी) आणि तानाजी सावंत (मूळ शिवसेना) यांचा प्रचार करण्याची नामुष्की भाजप नेत्यांवरती ओढवली आहे. परभणीच्या भाजपनेत्या मेघना बोर्डीकर यादेखील पूर्वीच्या काँग्रेसवासी आहेत. बुलडाण्यात प्रतापराव जाधव आणि संजय गायकवाड (मूळ शिवसेना) या दोघांचाही भाजपशी काडीमात्र संबंध नाही. अमरावतीमधील नवनीत राणा यांच्या आगमनामुळे भाजपच्याच नेत्यांच्या डोक्यावर आठ्या पडल्या आहेत. संजय राठोड (मूळ शिवसेना) यांनी राजीनामा द्यावा, यासाठी भाजपचे सर्वच नेते एकटवले होते. भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (मूळ राष्ट्रवादी) यांची भाजप पक्षानेच बोलती बंद करून आता यवतमाळमध्ये भाजप कार्यकर्ते संजू भाऊ आगे बढो ही घोषणा देताना पाहायला मिळणार आहे. वाशीममध्ये ज्या भावना गवळी (मूळ शिवसेना) यांच्यावर ईडी कारवाई व्हावी म्हणून भाजप नेते आंदोलन करत होते त्याच भावना गवळींचा प्रचार करण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावरच आली आहे. भंडारा-गोंदियातील भाजप नेते मंडळी प्रफुल्ल पटेल यांचा प्रचार का करावा, अशी अंतर्गत भूमिका मांडत आहेत. वर्ध्यातील भाजप नेते रामदाम तडस हेदेखील मुळात भाजपचे नाहीत. नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या नागपुरात देखील समीर मेघे (मूळ काँग्रेस), कृपाल तुमाने (मूळ शिवसेना) यांच्या प्रचाराची धुरा भाजपवर आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »