संपादकीय : प्रजाहत्त्याक


“संविधान कितीही चांगले असले, तरी त्याची अंमलबजावणी करणारे चांगले नसतील, तर ते वाईटच ठरेल. संविधान कितीही वाईट असले तरी त्याची अंमलबजावणी करणारे चांगले असतील तर ते चांगलेच असल्याचे सिद्ध होईल.”
— डॉ. बाबासाहेब आंबेडकर

​भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्षी संविधान अंमलबजावणीबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली ही भविष्यवाणी प्रजासत्ताकाच्या ७६ व्या वर्षामध्ये बरोबर तंतोतंत खरी ठरली आहे. विश्वगुरु भारताचे रुपया आशिया खंडातील सर्वांत खालचा आहे. बांगलादेशी व पाकिस्तानी पैशांपेक्षाही घसरत आहे. अन्य भुके कंगाल देशांचे चलन आंतरराष्ट्रीय पातळीवर घसरत नाही, परंतु भारतीय चलन मात्र दिवसेंदिवस पाताळात जाणार आहे का असा प्रश्न जागतिक अर्थतज्ज्ञांना पडला आहे.

​भारताच्या भौगोलिक सीमा सुद्धा आज सुरक्षित नाहीत. भारताचा नकाशा बदललेला आहे. प्रजासत्ताकाच्या ७६ व्या वर्षी भारतीय भौगोलिक सीमा व नकाशा बदलावा यासारखे दुर्दैव नाही. भारतीय नकाशावरून अरुणाचल प्रदेश संपुष्टात येत आहे. चीनने गलवान खोऱ्यात आजही ताबा घेतल्याचे स्पष्ट होत आहे. पाकिस्तान भारतीय अर्ध्या काश्मीरमध्ये धाड मांडून बसला आहे. ज्या देशाला आपल्या सीमा सुरक्षित ठेवता येत नाहीत. असा देश विश्वगुरू म्हणून उदयास येत आहे.

भारतामध्ये बेकारीने सुशिक्षित तरुणांचे व कष्टकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाही अब्जावधी रुपयांची परकीय गुंतवणूक गुगल मॅपवर शोधूनही सापडत नाही. मग ही गुंतवणूक चंद्रावर की मंगळावर केली आहे, हा प्रश्न कोणास कोणी विचारावा.

​भारतीय राजकारणाची कचरपट्टी “भगवा करण, हिरवा करण, पिवळा करण, लाल करण, निळा करण”, या रंगांमध्ये अडकून सौर्भव भारताचे विद्रुपीकरण चालू आहे. धार्मिक विकृतीने या देशामध्ये हौदोस घातला असून या देशाचे विघटनवादी प्रवृत्ती या धर्म अतिरेक्यांना मदत करत आहेत, प्रोत्साहन देत आहेत. रसद व साधनं पुरवत आहेत. हेच लोक संविधानाचे गोडवे गात संविधानाची अंतयात्रा चितेवर पोहचवण्याचं काम करत आहेत. धन्य ते राष्ट्र प्रेम संविधानाच्या पायदळी तुडवून संविधानाची जयजयकार करणारी ही अतिरेकी औलाद उद्या या देशाला धर्माच्या नावाखाली बरबाद केल्याशिवाय राहणार नाही.

​या देशाचा मालक हा देशाचा नागरिक नसून या देशाचे ठराविक उद्योगपती आहेत. ठराविक एकोणीस कुटुंबांमध्ये भारतीय संपत्तीचा नव्वद टक्के हिस्सा असलेला हा भारत प्रजासत्ताक कसा? या भारताची सत्ता प्रजेकडे नसून मालमत्ता असलेल्या लोकांकडे आहे. या दरिद्री प्रजेला खरेदी करून गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता हस्तगत करण्याचे सामर्थ्य या उद्योगपतींच्या देणग्यांमधून पक्षांना येते व लोकशाही गाडली जाते. या सत्तेचे मूळ उद्देश प्रजा शोषण असून विकासाच्या नावावर बकालपणा निर्माण करण्याचे धोरण आहे.

Advertisemen

​या देशातील असंख्य नद्या संपुष्टात आल्या असून उर्वरित सर्व नद्या ‘गटर गंगा’ झाल्या आहेत. नमोमी गंगा म्हणणारे सरकार या गंगेचे पाणी जनावरांच्या पिण्या-स्नानासाठी ही उपयुक्त नसल्याचा अहवाल याच देशाच्या पर्यावरण विभागाने दिला आहे. या देशाचे नैसर्गिक सौंदर्य संपुष्टात येत असून डोंगर-दऱ्या जंगल नष्ट केली जात आहेत. नैसर्गिक सौंदर्य शून्य भारताची निर्मिती करण्याचा पैजेचा विडा या सरकारने घेतला असून या देशातील नदी नाले, ओढे, जंगल, पहाड या उद्योगपतींच्या घशात घालण्याचे काम सरकारे करत आहेत. तरीही माझा भारत महान आहे.
​हजारो वर्षांपासून चालू असलेली अस्पृश्यता जिला महात्मा गांधी कलंक म्हणतात, तीच व्यवस्था आजही भारतात कलम केलेल्या स्वरूपात आकाशाला गवसणी घालत आहे. इथला ९० टक्के समाज सरकारच्या स्वस्त धान्य दुकानांवर अन्नासाठी अवलंबून आहे. हे दारिद्र्याचे लक्षण नसून भारतीय सत्ताधाऱ्यांचा स्वाभिमान आहे. इथल्या बुरसटलेल्या व्यवस्थेला प्रश्न विचारणारा देशद्रोही, अतिरेकी असतो, तर या अन्यायकारक व्यवस्थेला अमानवी ऋणी परंपराना मानणारा त्याचा प्रचार करणारा, त्याचे लालनपालन व पोषण करणारा देशभक्त कसा? परकीयांना भारतावर आक्रमणाचे आमंत्रण देऊन त्यांची चाकरी करणारा क्रांतीकारक कसा? या सगळ्या दृष्ट चक्रातून भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय समृद्ध भूभूमी परकीयांच्या चरणी अर्पण करणारा राष्ट्रभक्त कसा? शैक्षणिक मूलभूत अधिकार हिसकावून घेऊन इथल्या वैज्ञानिक दृष्टीकोन, विवेकवादी विचार संपुष्टात आणणारा राष्ट्रभक्त कसा?
​राष्ट्रवादाचे पांघरून घेऊन शत्रू राष्ट्रांना, राष्ट्रविरोधी प्रवृत्तींना खतपाणी घालण्याचे ऐतिहासिक संदर्भ आज पुन्हा पुनर्जन्म घेऊन याच देशात जन्म घेत आहेत आणि उद्याच्या भारताचा लिलाव करण्याचे षडयंत्र रचत आहेत. या भांडवलशाही व्यापारी राजकारण्यांना व त्यांच्या विषारी व्याल्यांना फळ येण्यापूर्वीच या देशातून समूळ नष्ट करून त्यांचा अंत्यसंस्कार विधी करण्याचे सामर्थ्य या देशातील कोणत्या विचार प्रवाहामध्ये आहे का?
​घर बसव्या राष्ट्रभक्तांचे मुखवटे उतरवून जगासमोर नंगे करायची वेळ आली आहे. ७६ वर्षात या देशात या विरुद्ध मोठी लढाई कोणी केलेली नाही, ती करण्याची वेळ आज येऊन ठेपली आहे. ७६ वर्षात भारतातील लोकांना शुद्ध श्वास घेता येत नाही, शुद्ध पाणी मिळत नाही, शिक्षण, निवारा, धड कपडे मिळत नाहीत. पण दुसऱ्या बाजूला हे चोर उद्योगपती सामान्य नागरिकांच्या कराचे पैसे घेऊन परदेशात पळून जातात तर याच भाड खाणाऱ्या उद्योगपतींना कर्जमाफी, करमाफी, मोफत जमिनी, सवलतीत वीज अशा योजना देऊन सर्वसामान्यांच्या करातून या धनदांडग्यांना, देशद्रोह्यांना सरकार पोसत आहे व या देशावर राज्य करण्यासाठी परकीय शत्रूंना आमंत्रित करणारी परंपरा वर्षानुवर्षे आजही चालू आहे आणि प्रजासत्ताक अमर रहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही.

​नव्हे राजकारण्यांची प्रशासनाच्या मदतीने भारत देशाचे वस्त्रहरण करणे व धनदांडग्यांना संरक्षण देणे म्हणजेच आधुनिक लोकशाही.

​सच्च्या राष्ट्रप्रेमींना संविधान वाद्यांना दिनाच्या/प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »