गायीला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करा; बारामतीतील मुस्लिम बांधवांचे प्रशासनाला निवेदन


बारामती : महाराष्ट्रातील गोहत्या बंदी, गोतस्करी प्रतिबंध व गोसंरक्षण कायद्याला बारामतीतील मुस्लिम समाज बांधवांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. हिंदू बांधवांची श्रद्धा असलेल्या गोमातेला देशाचा “राष्ट्रीय पशू” म्हणून घोषित करण्यात यावे, अशी अधिकृत मागणी बारामती मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भातील विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन आज बारामतीचे प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) आणि शहर पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.

शेतकऱ्यांना मदत व शासकीय जबाबदारीची मागणी

गोवंश संरक्षणाची अंमलबजावणी होत असताना शेतकरी व पशुपालकांसमोर अनेक आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. यावर उपाय म्हणून मुस्लिम समाजाने शासनाकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:

गोशाळांना अनुदान: गोपालन आणि गाईंचे संवर्धन योग्य रितीने होण्यासाठी शेतकऱ्यांना व गोशाळांना प्रति प्राण्यामागे प्रतिदिन ५०० रुपये अनुदान द्यावे.

Advertisemen

आर्थिक मोबदला: निरुपयोगी किंवा आजारी गाईंचे पालन करणे अशक्य असलेल्या शेतकऱ्यांना शासनाने योग्य आर्थिक मोबदला द्यावा.

खर्च शासनाने उचलावा: गोशाळा व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, चारा आणि मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याची संपूर्ण आर्थिक जबाबदारी शासनाने स्वतः स्वीकारावी.

कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी
कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने बेकायदेशीर गोतस्करी करणाऱ्यांवर थेट ‘मोक्का’ (MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, गोसंरक्षणाच्या नावाखाली कायदा हातात घेणाऱ्या, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या किंवा मॉब लिंचिंग (मारहाण) करणाऱ्या प्रवृत्तींवरही तितकीच कडक कारवाई व्हावी, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
भारतीय संविधानातील कलमांचा आदर राखून शासनाने सर्वसमावेशक धोरण राबवावे, अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली असून, मुस्लिम समाजाच्या या सामंजस्याच्या भूमिकेचे बारामतीत कौतुक होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »