बारामतीत भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू


बारामतीत भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू

बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत विमानतळ रोड ते पेन्सिल चौक मार्गावर हिरकणी गोडाऊनसमोर भरधाव किया सोनेट कारने स्कूटीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना 27 ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास घडली. या अपघातात स्कूटीवरील दोन महिलांचा मृत्यू झाला असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता प्रदीप लोंढे (वय 38) आणि मनीषा बबन शिंदे (वय 43), दोघी रा. पिंप्रद, ता. फलटण, जि. सातारा या प्लेजर स्कूटी क्रमांक MH 14 DW 1531 वरून ड्रीम प्लास्ट कंपनीकडे जात होत्या. स्कूटी संगीता लोंढे चालवत होत्या.

Advertisemen

दरम्यान, पाठीमागून आलेल्या किया सोनेट कार क्रमांक MH 42 BK 0707 च्या चालक शुभम शिवाजी खामकर (रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे) याने भरधाव वेगात, हयगयीने आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून स्कूटीला पाठीमागून धडक दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या धडकेत दोन्ही महिलांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान अथवा अपघातातील दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी प्रदीप बबन लोंढे यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणी गु.र.जि. नं. 405/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 106, 281, 125(a), 125(b) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास ग्रे.पो.स.ई. श्रीरंग शिंदे करीत असून, प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार चव्हाण यांनी केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »